For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आदिवासी आरक्षणाचा घोळ, सरकारची कोंडी

06:12 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आदिवासी आरक्षणाचा घोळ  सरकारची कोंडी
Advertisement

आदिवासींच्या आरक्षणाच्या घोळाने भाजप सरकारची कोंडी झालेली आहे. स्वपक्षीय नेतेही सरकारविरुद्ध दंड ठोकू लागले आहेत. सरकार पक्षाला वेठीस धरण्यास हा विषय विरोधकांनाही उपयुक्त ठरत आहे. जर खरोखरच आदिवासींना न्याय द्यायची इच्छा आहे तर सरकारने सूचविलेल्या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी आदिवासी उमेदवार उभे करण्याचे सामंजस्य का दाखवू नये! आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. मात्र आदिवासींसाठीचे बहुचर्चित आरक्षण आताच असावे की नव्या जनगणनेनंतर असावे, मर्यादित काळासाठी असावे की पेडणेसारखेच अनंत काळासाठी असावे, फिरत्या पध्दतीने असावे की कायम आहे तिथेच असावे, हा मुद्दासुध्दा सर्वसामान्यांच्या मनात घोळत आहे.

Advertisement

राजकीय आरक्षणाच्या विषयावर गोव्याचे राजकारण सध्या तापलेले आहे. गोव्याच्या अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी समाजाला त्यांच्या 23 वर्षांच्या संघर्षानंतर विधानसभा निवडणुकीत दहा टक्के आरक्षण देण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले. त्यासाठी या समाजाला बऱ्यापैकी राजकीय दबावतंत्रच वापरावे लागले. अन्यथा कदाचित हा प्रश्न मार्गी लागलाच नसता. सरकारचा आदेश शिरोधार्ह मानून, राज्य सरकारनेही येत्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींना घटनेने दिलेला आरक्षणाचा अधिकार बहाल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला तरी आरक्षण प्रत्यक्ष लागू करण्यासाठी, आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, आवश्यक कालावधी सरकारकडे नव्हताच. तरीही राज्य सरकारने हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. डिसेंबरपर्यंत आरक्षणाची अधिसूचना काढू, असाही विश्वास सरकारने व्यक्त केला. मात्र आदिवासी लोकसंख्येच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाला सामोरे जावे लागेल, याचीही पूर्वकल्पना सरकारला होतीच. सरकार या आव्हानाला सामोरे गेले परंतु यशस्वी होऊ शकले नाही.

Advertisement

आरक्षणाला घेण्यात आलेल्या आक्षेपाचा मुद्दा न्यायालयाला पटला की, न्यायालयात सरकार कमी पडले, हा मुद्दासुध्दा चर्चेत आहे. आदिवासींच्या आरक्षणाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने, आरक्षण पुन्हा अडकले आहे. सरकारने या स्थगिती आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे या आरक्षणाचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरच ठरणार आहे. तोपर्यंत आरक्षणासाठी करावी लागणारी प्रक्रियाही अडकून पडणार आहे. कदाचित या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आदिवासी जमातीच्या इच्छुक उमेदवारांना, 2032 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागेल.

गोव्याच्या अनुसूचित जमातीला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही आदेश काढले आणि कार्यवाहीसाठी प्रक्रियाही हाती घेतली. स्थगिती आदेशाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात लढत आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करीतच आहे मात्र याचा कोणताच परिणाम आरक्षणाचा अधिकार मागणाऱ्यांवर होत नाही आणि विरोधी राजकीय पक्षसुध्दा या प्रश्नावर सरकारवर खापर फोडण्याची संधी सोडत नाही.

मागच्या 23 वर्षांच्या काळात हा प्रश्न सोडविण्यासाठी किंवा आदिवासींना आरक्षणाचा अधिकार देण्यासाठी, कुणी काय काय केले आणि कुणी काय नाही केले, याचा हिशोब जगजाहीर आहे. खरेच राजकीय पक्षांना, गोव्यातील आदिवासींना राजकीय आरक्षण द्यायला हवे असे मनापासून वाटते का, असा संशय वाटावा, अशी स्थिती मागच्या 23 वर्षांत दिसून आली आहे.

न्यायालयाच्या स्थगितीमुळे हाता-तोंडाकडे आलेला ‘आरक्षणा’चा घास येत्या निवडणुकीत तरी गिळता येणार नाही, अशीच चिन्हे आहेत. या परिस्थितीसाठी, विरोधी पक्ष आणि नेत्यांनी भाजपाला धारेवर धरले आहे. भाजपचे आदिवासी नेतेच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहेत, हे विशेष. खरेतर गोव्यातला आदिवासी समाज बराच पुढारलेला आहे. या समाजाने स्वबळावर शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक कमावलेले आहे. या समाजाने गोव्याला अनेक विभूती दिल्या. राजकीय क्षेत्रालाही विद्वान नेते या समाजाने दिले. गोवा विधानसभेने आतापर्यंत अनेक आदिवासी नेते पाहिले. त्यांना आरक्षणाची गरज कधी भासली नाही. दहा टक्के आरक्षणापलीकडे जाऊन अतिरिक्त पंधरा टक्के आमदार निवडून आणण्याचे बळ या समाजाकडे आहे. भविष्यात या बळावरच आदिवासी मुख्यमंत्री निवडण्याची क्षमताही त्यांच्याकडे येईल, असे स्वप्न बाळगणे गैर नाहीच परंतु त्यासाठी संयम ठेवावाच लागेल. आरक्षण मिळालेले आहे. कार्यवाही येत्या निवडणुकीत होणार की नाही, हाच प्रश्न आहे.

गावडा, कुणबी, वेळीपांचा आरक्षणाचा घोळ संपत नाही. त्यातच धनगरांचाही अनुसूचित जमातीत समावेशासाठी अडीच दशकांचा प्रयत्न फळास येऊ शकलेला नाही. त्यांनीही योग्य वेळ साधून सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. अनुसूचित जमातीत धनगर समाजाचा समावेश, हा मार्ग आरक्षणाकडे जातो. आरक्षणासाठी आणखी एक वाटेकरी तयार आहे. साधारण पंचवीस हजार लोकसंख्येचा हा गोव्यातील समाज, देशभरात आदिवासी म्हणून गणला जातो. गोव्यात का नाही, असा त्यांचा प्रश्न आहे.

हा समाज सध्यातरी फार दूरचे स्वप्न पाहात आहे. आरक्षणाच्या प्रश्नात सर्वाधिक गोची झालेली आहे ती संभाव्य आरक्षित मतदारसंघातील आमदार व अन्य इच्छुक उमेदवारांची. आरक्षणाच्या प्रश्नाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत त्यांनाही भवितव्याचा निर्णय घेता येत नाही. आरक्षण जाहीर झाले तर अनेक नेत्यांची गोची होईल आणि नाही झाले तर इच्छुक आदिवासी नेत्यांच्या स्वप्नांवर विरजण पडेल, हे सांगण्याची गरज नाही. या समाजाला येत्या  निवडणुकीत आरक्षण मिळायला हवे, असे जर खरेच वाटत असेल तर न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राखीव मतदारसंघ निवडावे व आदिवासी उमेदवार द्यावेत. सरकारने आरक्षणासाठी सांगे, केपे, नुवे आणि प्रियोळ मतदारसंघाची शिफारस निवडणूक आयोगाकडे केलेलीच आहे. आरक्षणाचा हट्टही पूर्ण होईल आणि न्याय मिळाल्याचे थोडेतरी समाधान, त्या समाजाला नक्कीच लाभेल. नवीन लोकसंख्येनुसार पुढच्या निवडणुकीत अधिकृत आरक्षण मिळेल, यात काही शंकाच नाही. आत्ताच राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर राजकीय पक्षांनी सामंजस्य दाखवावे. हे शक्य झाल्यास देशाच्या राजकीय इतिहासात त्याची नोंद नक्कीच होईल.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.