For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुभाजकावरील झाडे ठरताहेत धोकादायक

11:13 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुभाजकावरील झाडे ठरताहेत धोकादायक
Advertisement

रोपांचे वृक्षात रूपांतर झाल्याने वाहनचालक भीतीच्या छायेखाली : महानगरपालिका-वनविभागाने धोकादायक झाडे हटविण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरात दुभाजकांवर काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या लहान रोपट्यांचे आता मोठे वृक्ष झाले आहेत. या वृक्षांच्या फांद्या ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोसळत असून यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे महानगरपालिका व वनविभागाने एकत्रितरित्या धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे. शहरात अशास्त्राrय पद्धतीने ज्या प्रकारे गतिरोधक घालण्यात आले, त्याच पद्धतीने दुभाजकावर झाडे लावण्यात आली. केवळ फोटोसेशनसाठी काहींनी कोणताही विचार न करता मोठी झाडे लावली. परंतु, या झाडांची देखभाल तसेच धोकादायक फांद्या वेळच्या वेळी हटविल्या न गेल्याने आता त्यांचे मोठे वृक्ष तयार झाले आहेत. शहरातील काँग्रेस रोड, कॉलेज रोड, हनुमाननगर, महात्मा फुले रोड, शहापूर रोड या परिसरात दुभाजकावरील झाडे धोकादायक ठरू लागली आहेत. काँग्रेस रोड येथील दुभाजकावर तर मोठे वृक्ष तयार झाले असून ते कोसळल्यास आजूबाजूच्या इमारतींनाही नुकसान करणार आहेत. पावसाळ्याच्या दिवसात झाडांच्या फांद्या पडून अनेकांना दुखापती होत आहेत. तरीदेखील महापालिकेकडून वनविभागाकडे तर वनविभागाकडून महानगरपालिकेकडे बोट दाखविले जात असल्याने यामध्ये सर्वसामान्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.

सुदैवाने अपघात टळला

Advertisement

बेळगावमधील एका व्यावसायिकाच्या मुलावर शनिवारी सायंकाळी हनुमाननगर येथील दुभाजकावरील झाडाची फांदी कोसळली. वेगाने असणाऱ्या दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने वाहनाने तीन-चार पलटी घेतल्याने वाहनचालकाला जबर दुखापत झाली. यामुळे त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दुभाजकावरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.