बायपास रोड चौकाला झाडांचा अडथळा!
सांगली / संजय गायकवाड :
सांगली माधवनगर रोडवरील बायपास रोडवरील चौकालाही समस्यांचे ग्रहण आहे. चिंतामणीनगर येथील रेल्वेच्या नवीन उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर या चौकातील गजबज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण त्यामानाने चौकातील सुविधा व रूंदीकरण आणि भविष्यातील वाहनांची वाढती संख्या याचा विचार करून बायपास चौकातील झाडे हटविण्याची गरज अधोरेखित होत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे भविष्यात होणारे अपघात टाळण्याच्या दृष्टीने आत्तापासूनच चौकाच्या सुधारणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येथे नजिकच्या काळात सातत्याने छोटे मोठे अपघात होवू लागले तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
सांगली शहरातील बायपास रोड हा एक प्रमुख चौक आहे. सांगली माधवनगर रोडसह कृष्णा नदीवरील नव्या पुलावरून इस्लामपूरच्या दिशेला जाणाऱ्या एसटी बसेस वगळता सर्व अवजड वाहने, खासगी आरामगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर, कंटेनर, ट्रैकर अशी सर्व वाहने बायपास रोडने ये जा करत असतात. तसेच इस्लामपूरच्या दिशेने येणारीही सर्व वाहने ही बायपास रोडने सांगली शहरात प्रवेश करत असतात.
याबरोबरच माधवनगरच्या दिशेनेही ये जा करणारी सर्व वाहनेही बायपास रोडवरील चौकातूनच कॉलेज कॉर्नरमार्ग शहरात प्रवेश करत असतात. याशिवाय जुन्या बुधगाव रोडकडे जाणारी काही वाहने, रेल्वेस्टेशन, नवीन वसाहत, लाले प्लॉट, मिरा हौसिंग सोसायटी व हिंबर एरियाकडे जाणारी सर्व वाहने बायपास रोडनेच ये जा करत असतात. तर माधवनगर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मालमोटारी बायपास रोडनेच ये जा करत असतात. त्यामुळे बायपास रोड चौकात दिवसरात्र प्रचंड गर्दी असते. सांगलीला जोडल्या गेलेल्या सांगली मिरज रोडसह सर्वाधिक गर्दीचा रोड म्हणून माधवनगर रोडकडे पाहिले जाते. या रस्त्याने रोज शेकडो वाहने ये जा करत असतात.
२०१९च्या महापुरानंतर व चिंतामणीनगरला रेल्वेचा नवीन उड्डाणपुल झाल्यानंतर बायपास रोडवर पुलापासून कॉलेज कॉर्नरपर्यंत दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकी वाहनांनी शोरूम्स, मोठमोठी हॉटेल्स, बेकरी, ब्रेन्डेड कपडयांची शोरूम्स, ढाबे, खाणावळी, चहाच्या टपऱ्या, आईस्क्रीम पार्लर, दवाखाने, मेडीकल्स, व्यापारी व निवासी संकुले यामुळे कॉलेज कॉर्नर ते चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलापर्यंत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. एका बाजूला वाहनांची गर्दी त्यातच भरीस भर म्हणून मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री यामुळे बायपास रोडने ये जा करणाऱ्यांना मोठा त्रास होतो. भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांना धडकून येथे अनेकजण जायबंदी झाले आहेत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिखल साचलेला आहे. त्यामुळे वाहने घसरत असतात. बायपास रोड पुर्वपिक्षा खूपन मोठा झाला आहे. बायपास चौकाबरोबरच नव्याने बांधलेला चिंतामणीनगरचा रेल्वे उड्डाणपुलही अंधारात आहे. पुलावरून वाहतूक सुरू होवून आता जवळपास आठ दहा महिने होत आले तरी या पुलावर लाईट बसविलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना गाडयांच्या उजेडातच पुढे जावे लागते. या पुलावरून महापालिकेचे अनेक अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी ये जा करत असतात. पुलावरील लाईटच्या मागणीबाबत या भागातील सामाजिक संघटना व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांकडून निवेदने देण्यात आली. पण त्याबाबत कोणतीही हालनाल झालेली नाही. याबाबत पुलाचे काम करणारे ठेकेदार, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रेल्वे प्रशासन यापैकी कोणालाच काही सोयरसुतक नाही.
- चिंतामणीनगरच्या उड्राणपुलावर लाईट कधी लागणार
चिंतामणीनगरच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी येथे लोकांना अनेकवेळा आंदोलने करावी लागली. आता वाहतूक सुरू होवून पण जवळपास आठ दहा महिने झाले. पण अजूनही या पुलावर लाईटची सोय नाही. एवढा मोठा पुल अंधारात आहे. लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. चिंतामणीनगरच्या पुलावरून माधवनगरच्या दिशेने येणारी वाहने वेगाने खाली येतात. पुलाच्या दोन्ही बाजूला छोटा स्पीडब्रेकर जरी बसविला असला तरी पुल उतरल्यानंतरही वाहनांचा वेग कायम असतो. त्यांना समोरील झाडांचा अडथळा होत आहे. ही झाडे हटविण्याची आवश्यकता आहे. या झांडाना धडकून काहीजणांचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार राहणार
-उमेश पाटील, माजी उपमहापौर व व्यावसायिक