टेनिस कोर्ट रुंदीकरणासाठी जिमखाना मैदानावरील झाडांची कत्तल
नगरपालिकेच्या कृतीविरुद्ध नागरिकांसह मनसेचा असंतोष
सावंतवाडी -
सावंतवाडी जिमखाना मैदान येथे लाँग टेनिस कोर्ट रुंदीकरणाचे काम नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना या टेनिस कोर्टला लागून असलेली जुनी व खेळाडू, प्रेक्षक, व नागरिकांना सावली देणारी झाडे प्रशासनाने निर्दयीपणे कत्तल करून त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नगरपालिकेच्या या बेजबाबदार कृतीविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनीही निषेध व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.नगरपालिका प्रशासनाने धनधांडग्या काही मुठभर व्यक्तींसाठी या झाडांवर कुऱ्हाड चालवली असल्यामुळे पालिकेच्या या कारभारावर जिमखाना मैदान येथे येणाऱ्या नागरिक व क्रीडा प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.नव्याने सत्तेत आलेल्या कारभाऱ्यांनी विकास जरूर करावा, मात्र तो करत असताना नैसर्गिक संपदा जपावी. कारण एक झाड लावून ते मोठे होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जावा लागतो. मात्र कोणतेही सबळ कारण नसताना कित्येक वर्षापासून जिवंत उभी असलेली सावली देणारी झाडे क्षणात तोडून परिसर भकास करणे म्हणजे विकास नव्हे, याचे भान राखावे, असे क्रीडाप्रेमी, नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकाराचा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी देखील तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मैदान परिसरात असलेली हि जुनी झाडे तोडून नगरपालिका प्रशासनाने क्रीडाप्रेमी व नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे. सावंतवाडी शहरात नगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.मात्र हे अभियान राबविताना वर्षानुवर्ष सावली देणारी जुनी झाडे तोडून आपण वसुंधरा कशी काय टिकवणार असा सवाल मनसे तर्फे केसरकर यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे. लाँग टेनिस खेळणाऱ्या काही ठराविक व्यक्तींसाठी या झाडांचा बळी देण्याची आवश्यकता नव्हती. हि झाडे वाचवून टेनिस कोर्ट आणखी अद्ययावत करता आले असते. मात्र तसे न करता या झाडांचा बळी दिला व मैदान परिसरात असलेली नैसर्गिक सावली व नष्ट केली असा आरोप ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे. क्रिकेट मैदानावर क्रिकेट पाहण्यासाठी येणाऱ्या क्रीडा प्रेमींना या झाडांच्या सावलीचा आधार मिळत होता. ही सावली देणारी जुनी झाडे तोडण्यामागचे कारण प्रशासनाने जाहीर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी क्रीडाप्रेमी व मनसेतर्फे करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी रात्री होळी उत्सव साजरा करण्यासाठी जिमखाना मैदाना परिसरात गेलेल्या तेथील रहिवासी व क्रीडा प्रेमींच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावेळी अमेय तेंडोलकर, राजू भालेकर, महेश डोंगरे, पिंट्या गावडे, सतीश आकेरकर, गौरव केसरकर, नितीन सावंत, अमित सावंत, अतुल केसरकर, दिपक केसरकर, अमरेश आसोलकर, रोहन लाखे, विजय लाखे, रोहन पाटील, अमित लाखे व इतर क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.