‘वृक्षपुरुष’ पद्मश्री रामैया यांचे निधन
तेलंगणामध्ये एक कोटी रोपे लावण्याचा विक्रम नोंद
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणामध्ये एक कोटी रोपे लावणारे ‘वृक्षपुरुष’ पद्मश्री दरीपल्ली रामैया यांनी शनिवारी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रेड्डीपल्ली गावातील निवासस्थानीच रामैया यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्यांना खम्मम जिह्यात ग्रीन वॉरियर, चेट्टू (वृक्ष) रामय्या किंवा वनजीवी म्हणून ओळखले जात होते. गेल्या अनेक दशकांमध्ये एक कोटी झाडे लावल्याबद्दल रामैया यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
निसर्ग आणि पर्यावरणाशिवाय मानवजातीचे अस्तित्व अशक्य आहे यावर दरीपल्ली रामैया यांचा ठाम विश्वास होता. रामैय्या यांनी स्वत: वृक्षारोपण सुरू करतानाच संपूर्ण समाजावर प्रभाव पाडला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित करून तरुणांना प्रेरणा दिली. पर्यावरण संरक्षण निरीक्षक आणि वनयोद्धा रमैया यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल कुटुंबातील सदस्यांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या.