उचगाव फाटा-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या त्वरित हटवाव्यात
फांद्या रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला अडथळा : वनखात्याने दखल घेण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाटा ते बाचीजवळील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये झाडांच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. त्यामुळे सदर फांद्या तातडीने काढण्यात याव्यात, अशी मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांतून केली आहे. उचगाव ते बाची या तीन किलोमीटर अंतराच्या भागांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर विखुरलेल्या असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर तसेच शिनोळी येथील इंडस्ट्रीज एरियामध्ये माल घेऊन जाणाऱ्या आणि येणाऱ्या व इतर मालवाहू वाहने माल भरून जात असताना या फांद्या वाहनाला लागून अपघात घडत आहेत. तसेच या फांद्या केव्हाही रस्त्यावर कोसळून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाळलेला वृक्ष हटवण्याकडे दुर्लक्ष
तुरमुरी गावानजीक मोठा वृक्ष वाळलेला असून गेल्या अनेक महिन्यांपासून सदर वृक्ष तसाच आहे. या संदर्भात अनेकवेळा सदर वृक्ष काढण्यात यावा, अशी विनंती करूनदेखील अद्याप हा वृक्ष काढलेला नाही. सदर वृक्ष जर रस्त्यावर कोसळला तर या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या एखाद्या प्रवाशावरती कोसळून मोठी दुर्घटनाही घडू शकते. मोठा अपघात होऊ शकतो आणि वाहतूकही ठप्प होऊ शकते. यासाठी सदर वाळलेला वृक्षही तातडीने काढण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. संबंधीत वनखात्याने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याची दखल घेऊन या फांद्या हटवाव्यात आणि वाहतुकीला होणारी अडचण दूर करावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
वनखात्याची परवानगी नसताना एखादा वृक्ष तोडला तर वनखात्याला न कळविता देखील वनखात्याचे अधिकारी तातडीने येऊन अशा वृक्ष तोडणाऱ्या व्यक्तीवर धाड घालून वृक्ष कापण्याची सर्व मशिनरी जप्त करून त्याला शिक्षा केली जाते. मात्र नागरिकांतून ज्या वेळेला मागणी होते अशावेळी वनखाते याकडे दुर्लक्ष करते. असे न करता वनखात्याने अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याची दखल घेणे गरजेचे आहे, असे जनतेचे मत आहे.