दोन कारवर झाडाची फांदी कोसळून पाच लाखाचे नुकसान
बेळगुंदी फाट्याजवळील दूध संकलन केंद्रानजीक दुर्घटना
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील गणेश दूध संकलन केंद्र, बेळगुंदी फाट्याजवळ लावण्यात आलेल्या दोन कारवर झाडाची फांद्यी कोसळल्याने अंदाजे पाच लाखाचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सोमवारी साडेदहाच्या सुमारास रस्त्याकडेला असलेल्या जुनाट आंब्याच्या झाडाची फांदी या दोन कारवर कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये व झाडाखाली कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. उचगाव येथील भरमा ऊर्फ चंबा कोवाडकर हे आपली कार एमएच 03 सीबी 2550 ही गणेश दूध संकलन केंद्रासमोर लावून गेले होते. गणेश दूध संकलन केंद्राचे मालक प्रवीण मोतीराम देसाई यांनीही नेहमीप्रमाणे आपले केए 22 एमडी 3476 हे वाहन झाडाखाली पार्किंग केले होते. या दोन्ही वाहनांवर फांदी कोसळली. वनखात्याने व पीडब्ल्यूडी खात्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली जुनी व वाळलेली झाडे ताबडतोब हटवावीत, अशी जोरदार मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.