दुर्मिळ खनिजांसंबंधी अमेरिकेशी करार
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत वॉशिंग्टन डीसी येथे स्वाक्षऱ्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि वीजेवरची कार चालविण्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या यांचे उत्पादन करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळ्यांच्या संदर्भात भारताने अमेरिकेशी महत्वाचा करार केला आहे. या करारावर गुरुवारी येथे केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अमेरिकेच्या व्यापार मंत्री गिना रायमोंडो यांनी वॉशिंग्टन डीसी येथे स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्ही देशांचे महत्वाचे प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
पियुष गोयल सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी रायमोंडो यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर पुरवठा साखळी निर्मिती संबंधीच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच भारत आणि अमेरिकेत होत असलेल्या तंत्रज्ञान सहकार्य, ऊर्जा सहकार्य आणि संशोधन तसेच प्रशांत-भारतीय आर्थिक व्यवस्थेसंबंधीही त्यांनी चर्चा केली, अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाचा करार
या चर्चेच्या आधी दोन्ही नेत्यांनी महत्वाच्या दुर्मिळ धातू पुरवठा साखळ्यांसंबंधातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराचा दोन्ही देशांना लाभ होणार आहे. भारतात अनेक स्थानी दुर्मिळ धातूंचे साठे सापडले आहेत. या साठ्यांची उत्खनन करण्यासाठी भारताला गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता भासणार आहे. अमेरिकेलाही अशा धातूंची आवश्यकता आहे. अशा प्रकारे या कराराद्वारे दोन्ही देश एकमेकांच्या आवश्यकतांना पाठबळ देऊ शकतात. हा करार उभयपक्षी लाभाचा आहे, असे मत दोन्ही नेत्यांनी नंतर व्यक्त केले आहे.
चीनचे वर्चस्व
सध्या दुर्मिळ धातूंचा पुरवठा करण्यात चीन अन्य कोणत्याही देशापेक्षा आघाडीवर आहे. दुर्मिळ धातूंच्या एकंदर जागतिक मागणीपैकी 60 टक्के मागणी चीनकडून पूर्ण होते. त्यामुळे या बाजारावर चीनचे नियंत्रण आहे. तथापि, भारताने आपल्या भूमीत संशोधन केले तर आपल्याकडेही अनेक दुर्मिळ धातू सापडू शकतात. लिथियमच्या मोठ्या साठ्यांचा शोध अनेक स्थानी लागला आहे. या धातूचा उपयोग वाहनांच्या वीज बॅटऱ्या निर्माण करण्यासाठी होतो.
काही वर्षांपूर्वी सामंजस्य करार
काही वर्षांपूर्वीच भारत आणि अमेरिका यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेचा सेमीकंडक्टर विभाग आणि भारताचा इलेक्ट्रॉनिक विभाग यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. सेमीकंडक्टर सहउत्पादनासंदर्भा दोन्ही विभागांनी त्यांची सहकार्य कागदपत्रे सज्ज केली आहेत. भविष्यकाळात दोन्ही देश या महत्वाच्या वस्तूच्या उत्पादनासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत. भारताने येत्या 10 वर्षांमध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या कंपन्या भारतात या संदर्भात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. आगामी काही वर्षांमध्ये 3 ते 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात भारतात अपेक्षित आहे.
अमेरिकेच्या व्यापार विभागाचा विस्तार
अमेरिका आपल्या व्यापार विभागाचा विस्तार भारतात करण्याच्या विचारात आहे. भारतात लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप स्थापन करण्याची अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिका इलेक्ट्रॉनिक आणि कार उद्योगात जगात अग्रगण्य असून या क्षेत्रांमधील अमेरिकेच्या उत्पादनाचा जगाच्या साठ टक्के इतका मोठा आहे, अशी माहिती देण्यात आली.
..महिलांच्या मालकीच्या व्यवसायांवर भर
भविष्यकाळात भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने महिलांचा उद्योगक्षेत्रातील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारतात पूर्णपणे महिलांच्या मालकीचे उद्योग आणि व्यापार केंद्रे निर्माण करण्यावर भारत सरकारचा भर आहे. अमेरिकाही या प्रयत्नांमध्ये सहभागी होणार आहे.