For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्षण पाहून नव्हे संसर्गाच्या आधाराव होणार उपचार

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
लक्षण पाहून नव्हे संसर्गाच्या आधाराव होणार उपचार
Advertisement

संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी आयसीएमआरची नवी मार्गदर्शक यादी : तापावरून आजाराचा शोध

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ताप, खोकला किंवा श्वसनसमस्येवर केवळ लक्षणं पाहून औषध देण्याची पद्धत बदलू शकते. डॉक्टर प्रथम आजारामागे कोणता विषाणू, जिवाणू किंवा परजीवी आहे याचा शोध घेण्यावर भर देणार आहेत. यानंतर उपचार त्या संसर्गाला लक्ष्य करत केला जाणार आहे. यामुळे रुग्ण विनाकारण औषधे, अँटीबायोटिकच्या सेवनापासून वाचू शकतील. विनाकारण औषधांच्या सेवनामुळे लोकांच्या आरोग्यावर अत्यंत प्रतिकूल प्रभाव पडत आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) संक्रमणाच्या तपासणीसाठी एक नवी प्राथमिकता यादी तयार केली आहे. रुग्णांची लक्षणे पाहून कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे, याची तपासणी सुरुवातीलाच करावी असे या यादीत नमूद करण्यात आले आहे. आयसीएमआरने ही यादी देशभरातील तज्ञ डॉक्टर्स, प्रयोगशाळा तज्ञ आणि महामारी तज्ञांसोबत झालेल्या 44 बैठकांमध्ये चर्चा तसेच समान परिस्थिती असलेल्या देशांमध्ये झालेल्या संशोधनाच्या समीक्षेनंतर तयार केली आहे.

Advertisement

तापात प्रथम आजाराचे निदान

आयसीएमआरच्या यादीचा सर्वात महत्त्वपूर्ण हिस्सा अचानक कुठल्याही स्पष्ट कारण नसताना येणारा ताप आहे. यात 38 डिग्रीपेक्षा अधिक तापमान आणि 14 दिवस किंवा त्याहून कमी काळाचा ताप समाविष्ट आहे. अशा रुग्णांमध्ये प्राथमिकता 1 ए मध्ये मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड आणि पॅराटायफाइड, स्क्रब टायफस, फ्ल्यू, लेप्टोस्पायरा, चिकनगुनिया, ब्रुसेला आणि इतर संसर्गांची तपासणी केली जाऊ शकते.

तपासणीची दिशा कशी ठरविणार?

तापासोबत शरीरावर पुरळ आल्यास तपासणीची दिशा बदलणार आहे. अशावेळी गोवर, स्क्रब टायफस आणि इतर रिकेट्सियल संसर्ग, डेंगू, मंकीपॉक्सशी संबंधित विषाणू, एन्थ्रॉव्हायरस आणि झिका यासारख्या संसर्गाच्या तपासणीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

कोणत्या संक्रमणांना प्रथम पाहिले जाणार?

तापासोबत मान किंवा इतर ठिकाणी गाठ आल्यास एपस्टीन-बार व्हायरस, साइटोमेगालोव्हायरस, स्क्रब टायफस, ब्रुसेला, मेलियोइडोसिसशी संबंधित बॅक्टेरिया, रिकेट्सियल संक्रमण आणि क्षयरोग यासारख्या कारणांना पाहिले जाणार आहे. तापासोबत खोकला आणि श्वसनाची समस्या असल्यास आणि लक्षणे 10 दिवसांच्या आत सुरू झाल्यास फ्ल्यू, कोरोना, आरएसव्ही, रेस्पिरेटरी व्हायरस, मेटान्यूमोव्हायरस आणि एडेनोव्हायरस यासारख्या संक्रमणांसंबंधी चाचणी प्रथम केली जाणार आहे.

व्हायरसचा संशय आल्यावर हर्पीज, डेंग्यू, चिकनगुनिया, एंटरोव्हायरस, वेस्ट नाइल, निपाह आणि इतर विषाणू संक्रमणासंबंधी चाचणी केली जाऊ शकते. आयसीएमआरने या रोगजनकांना 1ए, 1बी, 2 आणि 3 यासारख्या प्राथमिकतांमध्ये ठेवले आहे. 1ए मध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी ओळख पटविणे महत्त्वपूर्ण मानले गेलेल्या संक्रमणांना सामील करण्यात आले आहे. पुढील श्रेणींमध्ये दुर्लभ किंवा विशेष देखरेखीची गरज असलेले रोगजनक समाविष्ट आहेत.

तापासोबत चक्कर येत असल्यास...

आयसीएमआरने अचानक मेंदू संक्रमण यासारख्या लक्षणांसाठी देखील वेगळी प्राथमिकता निश्चित केली आहे. यात 7 दिवस त्याहून कमी काळापासून तापासोबत भ्रम, ओळखणे-समजण्यास समस्या, बेशुद्ध पडणे किंवा बोलण्यास असमर्थता सामील आहे. अशा प्रकरणांमध्ये जपानी इंसेफेलायटिस, मलेरिया, स्क्रब टाइफस आणि रिकेट्सियल संक्रमणाला प्राथमिकता देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.