For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहन तपासणीवेळी चालकांशी आदराने वागा!

06:19 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाहन तपासणीवेळी चालकांशी आदराने वागा
Advertisement

वाहतूक-रस्ते सुरक्षा विभागाच्या पोलीस महासंचालकांचे पोलिसांना निर्देश

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहन तपासणी आणि वाहतून नियंत्रणावेळी वाहन चालकांशी आदराने वागावे, असे कडक निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. या संदर्भात, वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्रक जारी केले आहे.

Advertisement

राज्य पोलीस खाते हा एक शिस्तप्रिय विभाग आहे. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेले गैरवर्तन आणि अधिकाराचा गैरवापर संपूर्ण पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले आहे, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस खात्याने वेळोवेळी अनेक परिपत्रके आणि स्मरणपत्रे जारी केली असली तरी, काही पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान वाहन चालकांवर हल्ला करणे, त्रास देणे,  अपमानास्पद भाषा वापरणे आणि सार्वजनिक ठिकाणी वाद घालून चालकांचा अपमान करणे अशा घटना सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. मंड्या जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून वाहन तपासणीदरम्यान एका मुलाचा मृत्यू, विजयनगर जिल्ह्यातील कुडिलगी येथे एका कॉन्स्टेबलने बस चालकावर केलेला हल्ला, चित्रदुर्ग येथे वाहन तपासणीदरम्यान एका ऑटो चालकाला पोलिसांनी त्रास दिल्याची घटना आणि संडूरमध्ये एका पोलिसाने ट्रक चालकावर हल्ला केल्याची घटना प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर झळकली आहे. अशा घटना सातत्याने घडत असल्याने लोकांमदये राज्य पोलीस खात्याविषयी आदर कमी झाला आहे. या संदर्भात योग्य निर्देश देण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

त्यामुळे, दंडाची रक्कम वसूल करताना जनतेशी सौजन्याने आणि वाहन चालकांशी आदराने वागावे. जनतेच्या तक्रारींवर गांभीर्याने आणि त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

Advertisement
Tags :

.