For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुर्कियेत जमिनीत मिळाला खजिना

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुर्कियेत जमिनीत मिळाला खजिना
Advertisement

हजारो वर्षे जुन्या इमारतीखाली सोन्याची नाणी

Advertisement

मिशिगन युनिव्हर्सिटीच्या पुरातत्व तज्ञांच्या एका पथकाने प्राचीन युनानी शहर नोशनमध्ये सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या एका भांड्याचा शोध लावला आहे. पश्चिम तुर्कियेतील शहर नोशनमध्ये तिसऱ्या शतकातील ख्रिस्तपूर्व एका घरात उत्खनन करताना संशोधकांना प्राचीन नाण्यांनी भरलेले पात्र सापडले आहे. मिशिगन विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ आणि नोशन पुरातत्व सर्व्हेचे संचालक क्रिस्टोफर रॅटे यांनी नाणी जुन्या इमारतीच्या एका कोपऱ्याखाली गाडलेल्या अवस्थेत होती असे सांगितले. हे घर अत्यंत प्राचीन असले तरीही नाण्यांचा हा भांडार या घरापेक्षाही अत्यंत जुना असल्याचे कळते. ही नाणी ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील असल्याचे मानण्यात येत आहे. या नाण्यांवर गुडघ्यावर बसलेल्या धनुष्यधारी योद्ध्याचे चित्र कोरण्यात आल्याचे टीमकडून सांगण्यात आले.

डेरिक होते चलनाचे नाव

Advertisement

या नाण्यांना डेरिक्स या नावाने ओळखले जाते. हे एक फारसी चलन होते, जे नोशनपासून 60 मैल अंतरावर सार्डिस शहरात तयार करण्यात आले होते. त्यांचा  वापर सैनिकांना वेतन देण्यासाठी केला जात होता. संशोधकांनुसार एक डेरिक पूर्ण महिन्याच्या वेतनासमान होता. म्हणजेच सैनिकाला दर महिन्याला एक डेरिक देण्यात येत होता.

प्राचीन काळादरम्यान शतकांपर्यंत ग्रीक आणि फारसी सैन्यांदरम्यान झालेल्या अनेक संघर्षांचा नोशन शहर साक्षीदार राहिले आहे. 430 आणि 427 ख्रिस्तपूर्व काळादरम्यान या शहरात ग्रीक आणि व्रूर भाडोत्री सैनिकांनी अनेकदा नरसंहार केला होता. ख्रिस्तपूर्व 427 साली एक एथेनियन जनरलने शहराला पुन्हा मिळविण्यासाठी एक साहसी मोहीम राबविली होती. बहुधा त्याचवेळी नाण्यांनी भरलेले पात्र येथे लपविण्यात आले असावे असे संशोधकांचे मानणे आहे.

हा शोध अत्यंत दुर्लभ

पुरातत्व उत्खननात अशाप्रकारच्या मूल्यवान नाण्यांचा शोध अत्यंत दुर्लभ आहे. कुठलीही नाणी किंवा मूल्यवान धातू पुन्हा बाहेर काढण्याच्या उद्देशानेच जमिनीत गाडून ठेवण्यात येतात. अशा स्थितीत हा खजिना कशाप्रकारे तेथे पोहोचला हे समजून घेणे सोपे नसते. युद्ध किंवा उलथापालथीच्या काळात कुणीतरी नाणी सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना जमिनीत पुरले असावे असे क्रिस्टोफर रॅटे यांनी नमूद पेले आहे.

संशोधकांनी अलिकडेच नोशनमध्ये नव्याने उत्खनन सुरू केले असून आगामी संशोधनात या भांडारावर प्रकाश टाकणारी माहिती मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. याचदरम्यान तुर्कियेत इफिसस पुरातत्व संग्रहालयाचे संशोधक सोन्याच्या नाण्यांचे विश्लेषण करत आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे पुरातत्वतज्ञ एंड्य्रू मीडोज यांनी नाण्यांचा हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हणत यामुळे सोन्याच्या नाण्यांचा वापर आणि कालक्रम समजून घेण्यास मदत होणार असल्याचे नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.