मेट्रोतून विनापँट प्रवास
नव्या इंग्रजी वर्षाचा प्रारंभ झाला आहे. लवकरच या वर्षाचा दुसरा रविवार (11 जानेवारी 2026) येणार आहे. या दिवशी न्यूयॉर्क, लंडन आणि पाश्चात्य जगातल्या इतर अनेक महानगरांमधील मेट्रो रेल्वे गाड्यांमध्ये एक अनोखे दृष्य पहावयास मिळणार आहे. या दिवशी या शहरांमधील अनेक लोक मेट्रो गाड्यांमधून ‘विनापँट’ प्रवास करणार आहेत. हा दिवस ‘नो पँड सबवे राईड’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी पुरुष असो वा महिला, सारेजण मेट्रोतून प्रवास करताना पँट घालणार नाहीत. अर्थात, आतली वस्त्रे परिधान केली जातीलच. शिवाय शर्ट किंवा वरची वस्त्रे राहणारच आहेत. केवळ पँट, ट्राऊझर्स किंवा स्कर्ट अशी वस्त्रे परिधान केली जाणार नाहीत. हे या दिवसाचे वैशिष्ट्या राहणार आहे. तसे पाहिल्यास हा प्रकार नवा नाही, किंवा तो याच वर्षापासून होत आहे असेही नाही. या दिनाचा प्रारंभ 2002 मध्ये न्यूयॉर्कच्या एका ‘थिएटर ग्रूप’कडून झाला होता. या गटातील 7 जणांनी त्यावर्षी मेट्रोतून विनापँट काही काळ प्रवास केला होता. तेव्हापासून प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या रविवारी या दिवसाचे पालन अशाच प्रकारे केले जात आहे.
अर्थात, या प्रकारच्या प्रवासाचे काही नियम आहेत. ते सर्वांना कठोरपणे पाळावे लागणार आहेत. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या सर्वांनी अंतर्वस्त्रे घालणे अनिवार्य आहे. अंतर्वस्त्रे अशी असली पाहिजेत की ज्यामुळे प्रत्येकाचे लज्जारक्षण व्यवस्थित झाले पाहिजे. प्रवाशांनी इतरांशी योग्य प्रकारे वर्तणूक केली पाहिजे. तसेच या प्रकारामध्ये सहभाग स्वेच्छेने झाला पाहिजे. कोणावरही सक्ती केली जाता कामा नये, आदी नियम करण्यात आले आहेत. 2002 या वर्षी न्यूयॉर्कमध्ये प्रारंभ करण्यात आलेला हा प्रकार आता जगभरातील, विशेषत: पाश्चात्य जगातील अनेक शहरांमध्ये लोकप्रिय झाला आहे. हे करण्यामागचे कारण काय, याची कोणालाही माहिती नाही. वर्षातील एक दिवस असे केल्याने काय साध्य होते, तेही कोणाला माहित नाही. केवळ एक ‘फॅड’ किंवा विचित्रपणा एवढाच त्याचा अर्थ सध्यातरी दिसून येत आहे. अनेकजण हा दिवस अशा प्रकारे अत्यंत निष्ठेने पाळतात, असेही दिसून आले आहे. 2026 हे या दिवसाचे 25 वे वर्ष आहे. तेव्हा या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षात या प्रकारात भाग घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही, हे स्पष्ट आहे