राष्ट्रीय महामार्गांवर प्रवासात होणार दहा हजारांची बचत
कोल्हापूर :
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल टॅक्स नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. या बदलामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या खासगी वाहनांसाठी फास्ट टॅग आधारित वर्षभराच्या तीन हजारांच्या पासमुळे तब्बल दहा हजारांची बचत होणार आहे.
- नितीन गडकरी यांची एक्सवर माहिती
नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक् वर याबाबत माहिती देताना लिहिले, “राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाला त्रासमुक्त आणि किफायतशीर बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. 15 ऑगस्ट 2025 पासून 3,000 रुपयांचा फास्टटॅग आधारित वार्षिक पास सुरू होत आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा 200 प्रवासांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल) तिथपर्यंत वैध असेल. हा पास विशेषत: गैर-व्यावसायिक कार, जीप आणि व्हॅन या खासगी वाहनांसाठी असेल.
- सर्वसामान्यांना कसा होणार फायदा?
राष्ट्रीय महामार्गांवर नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा पास उपयुक्त ठरणार आहे. सध्या टोल नाक्यांवर प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. ज्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्यांना आर्थिक आणि वेळेचा त्रास सहन करावा लागतो. या नव्या योजनेमुळे एकाच वेळी तीन हजार रुपये भरून वर्षभरात 200 प्रवासांपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येईल. यामुळे प्रवाशांची सुमारे दहा हजार रुपयांची बचत होईल, असा दावा गडकरी यांनी केला आहे.
- योजना का आणली ?
सध्या देशभरात सुमारे 12,000 टोल नाक्यांद्वारे 45 हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांवर टोल आकारला जातो. यापैकी बहुतांश टोल नाक्यांवर फास्ट-टॅग प्रणाली कार्यरत आहे. ही प्रणाली आरएफाआयडी तंत्रज्ञानाद्वारे कॅशलेस टोल संकलन करते. यापूर्वी सरकारने तीस हजार रुपये किमतीचा 15 वर्षांसाठीचा ‘लाइफटाइम फास्टटॅग‘ पास आणण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु तो रद्द करण्यात आला. त्याऐवजी आता ही अधिक किफायतशीर आणि व्यावहारिक योजना आणली गेली आहे.
- नव्या पाससाठी काय करावे लागेल
हा पास सक्रिय करण्यासाठी वाहन मालकांना त्यांचे वाहन नोंदणी क्रमांक आणि वैध फास्टटॅग क्रेडेन्शियल्स प्रदान करावे लागतील. यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसेल. सरकार लवकरच ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आधारित बॅरियर-लेस टोलिंग सिस्टम‘ देखील लागू करणार आहे. ज्याद्वारे वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. टोल शुल्क स्वयंचलितपणे आकारले जाईल.