For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत ट्रॅव्हल एजन्सीकडून 79.46 लाखांचा गंडा

08:42 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजीत ट्रॅव्हल एजन्सीकडून 79 46 लाखांचा गंडा
Advertisement

परदेश दौरे, व्यवसाय विस्ताराचे दाखविले आमिष : पणजी पोलिसांत एजन्सीच्या संचालकांवर गुन्हा

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : परदेश दौरे आणि ट्रॅव्हल व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली तक्रारदारांची तब्बल 79 लाख 46 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी काल बुधवारी एका नामांकित ट्रॅव्हल कंपनीच्या दोन संचालकांवर रीतसर गुन्हा  नोंदवला आहे. जेएसीआय ट्रॅव्हल्स प्रा. लि. असे या ट्रॅव्हल कंपनीचे नाव असून या प्रकरणाने गोव्यातील पर्यटन आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

अधिकृत माहितीनुसार, पीडित तक्रारदारांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पणजी पोलिसांनी काल 29 जुलै रोजी जेएसीआय ट्रॅव्हल्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक नितेश चंद्रा आणि जसिंता शबोंग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 तीन वर्षांत उकळले 79.46 लाख रुपये

या प्रकरणातील संशयित संचालकांनी तक्रारदारांना विविध आकर्षक आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेस आणि ट्रॅव्हल व्यवसायात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडल्यामुळे तक्रारदारांनी वर्ष 2023 ते 15 जून 2026 या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 79,46,000 रुपये आरोपींच्या बँक खात्यावर आणि कंपनीत जमा केले होते.

  परदेशदौरे झालेच नाही, पैसे बुडाले

तक्रारदारांकडून एवढी मोठी रक्कम हस्तगत केल्यानंतरही आरोपी संचालकांनी ठरल्याप्रमाणे कोणत्याही परदेश दौऱ्यांचे नियोजन केले नाही. तसेच, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदारांनी जेव्हा पैशांची परतफेड मागितली, तेव्हा संचालकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार देत ती रक्कम हडप केली. अखेर फसवणूक झाल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाल्यावर पीडितांनी पणजी पोलिस ठाण्यात धाव घेतली, ज्यावर पोलिसांनी काल बुधवारी कायदेशीर कारवाईला सुरवात केली आहे.

 बँक खात्यांची चौकशी सुरू

गुन्हा दाखल होताच पणजी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. संशयित आरोपी नितेश चंद्रा आणि जसिंता शबोंग या दोघांनाही चौकशीसाठी तात्काळ हजर राहण्याबाबत पोलिसांनी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. या फसवणुकीच्या जाळ्यात गोव्यातील इतरही नागरिकांना ओढण्यात आले आहे का, यादृष्टीने पोलिस आता कंपनीच्या बँक खात्यांची आणि व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.

Advertisement
Tags :

.