वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर 'ट्रॉमा केअर सेंटर' उभारावे
पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार : माजी उपसभापती शीतल राऊळ
प्रतिनिधी
बांदा
अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत किंवा महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर' उभारण्याची नितांत गरज असल्याचे मत भाजपचे सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती शीतल राऊळ यांनी व्यक्त केले आहे. यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले असून, उपचारासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांना गोवा किंवा बेळगाव येथे न्यावे लागते. यात अनेकदा रुग्णांचा जीव जातो. ही परिस्थिती लक्षात घेता, स्थानिक पातळीवर तातडीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.शीतल राऊळ यांनी सांगितले की, "अपघातात शेकडो जणांना जीव गमवावे लागत आहेत. उपचार करणारी यंत्रणा नसल्याने अनेक तरुणांना जीव गमवावा लागतो. हे खूप वेदनादायी आहे." कुडाळ ते बांदा या महामार्गाच्या परिसरात जर ट्रॉमा केअर सेंटर उभारले, तर त्याचा मोठा फायदा अपघातग्रस्तांना होईल.यापूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाले होते, पण त्याचे पुढे काय झाले, याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही राऊळ यांनी म्हटले आहे.अपघातातील मृतांची संख्या वाढत असल्याने सर्वसामान्य लोकांना गोवा किंवा बेळगावऐवजी स्थानिक पातळीवरच आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ट्रॉमा केअर सेंटर जलदगतीने उभारण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टरही रुजू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. राऊळ लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्याशी संपर्क साधून या मागणीचा पाठपुरावा करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.