परिवहन कर्मचारी 20 मेपासून संपावर
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी सरकारवर दबाव
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. 20 मे पासून अनिश्चित कालावधीसाठी संप पुकारण्याची घोषणा परिवहन कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यामुळे 20 मेपासून राज्य परिवहनमधील चारही निगममधील बससेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संयोजक जयदेवराजे अर्स यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. अन्यथा, आम्ही संपावर जाऊ. 20 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून परिवहन कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जातील, असा इशारा दिला.
संपात 1.25 लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. परिवहन कर्मचारी संयुक्त कृती समितीने अनेक मागण्या मांडल्या असून, सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या 12 फेऱ्या निष्फळ यापूर्वी ठरल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकार 38 महिन्यांऐवजी 26 महिन्यांची थकबाकी देण्यास तयार असले तरी, कर्मचाऱ्यांनी हे नाकारले आहे. उर्वरित 12 महिन्यांची थकबाकी पूर्णपणे द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, राज्य सरकार आणि परिवहन कर्मचारी संघटना यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
20 मेपासून परिवहन कर्मचारी संपावर गेले तर राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेवर परिणाम होईल. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषत: विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागू शकते.
मागण्या...
► 38 महिन्यांची वेतनाची थकबाकी द्यावी
► 1 जानेवारी 2024 पासून मूळ वेतनात 25 टक्के वाढ लागू करावी
► 31 टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात विलिन करावा
► दैनिक भत्ता व इतर भत्त्यांत वाढ करावी
► कोविड काळातील थकबाकी द्यावी
► 26 महिन्यांची 1,272 कोटी रु. थकबाकी एकाच हप्त्यात मंजूर करावी