बेळगुंदी-राकसकोप भागातील वाहतुकीकडे परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
भागात पाठविल्या जात आहेत खराब अवस्थेतील बसेस : बससेवेचा बोजवारा : अनियमित अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी व राकसकोप परिसरात अपुऱ्या-अनियमित व खराब बसमुळे बससेवेचा बोजवारा उडाला आहे. या भागातील बसेस खराब अवस्थेतील आहेत. याच बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो आहे. तसेच अनियमित बसफेऱ्या आहेत. वारंवार राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही या भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. या भागात सुरळीत व नवीन बस सुरू करण्यात याव्यात. अन्यथा आंदोलन छेडण्याच्या इशारा नागरिकांनी दिला आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी, राकसकोप, कावळेवाडी, बाकनूर, गोल्याळी या भागात राज्य परिवहन मंडळाच्या डेपो क्रमांक तीन, क्रमांक दोन व क्रमांक चारमधून बसफेऱ्या येत असतात. मात्र येथून येणाऱ्या बसेस या बहुतांशी प्रमाणात खराब अवस्थेतील आहेत. या खराब बसमुळेच शुक्रवारी सकाळी बेळगुंदी-राकसकोप रोड कल्लेहोळनजीक बस ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट झाडाला जाऊन आदळली. या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले. यामध्ये काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
बेळगुंदी-राकसकोप भागात येणाऱ्या बसफेऱ्या अपुऱ्या व अनियमित तर आहेतच. यातच या बसेस खराब अवस्थेतील आहेत. पावसाळ्यात तर या बसमध्ये पूर्णपणे गळती लागलेली असते, अशी माहिती प्रवासी व विद्यार्थ्यांनी दिली आहे. या भागात दोन दिवसातून एखादी बस रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या अवस्थेत दिसून येते. अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत, असेही या भागातील स्थानिक सांगत आहेत. आम्ही राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार जाऊन याबाबत सूचना केलेली आहे. या भागात नवीन बस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे?असा सवाल स्थानिक नागरिक व प्रवासी वर्ग करत आहेत.
अपुऱ्या व अनियमित बसफेऱ्यांमुळे प्रवासीवर्गांना तासन्तास बसथांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे. या भागात बस कधी येतात आणि कधी जातात याचे वेळापत्रकच प्रवासी वर्गांना माहित नाही. यामुळे त्यांची मात्र गैरसोय निर्माण झालेली आहे. जुन्या व खराब अवस्थेतील बसफेऱ्या या भागात येतात. त्यामुळे वाहक व चालक जर एखाद्या गावाला दिवसातून सहा फेरे असतील तर येण्या जाण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागत आहे. यामुळे ते केवळ चारच फेऱ्या करतात, असा प्रयोग या भागात सध्या सुरूच आहे. या भागातील विद्यार्थी बेळगावला शाळा, कॉलेजला मोठ्या प्रमाणात येतात .मात्र त्यांना अपुऱ्या व अनियमित बसफेऱ्यांमुळे शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यास परिवहन मंडळच जबाबदार राहील!
शुक्रवारी सकाळी बेळगुंदी रस्त्यावर बसचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट बस जाऊन झाडाला आदळली. यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याला जबाबदार राज्य परिवहन मंडळच आहे. कारण या भागात खराब अवस्थेतील बस पाठवल्या जात आहेत. यापूर्वी आम्ही अनेकदा मागणी केलेली आहे की, आमच्या भागात नवीन व चांगल्या अवस्थेतील बस पाठवा. तरीही राज्य परिवहन मंडळाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? येत्या आठ दिवसात या भागात जर नवीन बस उपलब्ध करून दिल्या नाहीत तसेच एखादी मोठी दुर्घटना घडल्यास डेपो मॅनेजर व डिव्हिजन कंट्रोलर यांच्यावरती थेट कारवाई करू. त्यामुळे आमच्या भागात नवीन बसेस सुरू करून द्यावी.
- अॅड. नामदेव मोरे
