परिवहन मंडळाचा प्रवास 'रामभरोसे'
बेळगाव-हैदराबाद मार्गावर सोडली मोडकळीस आलेली बस : परिवहन मंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर : लांबपल्याच्या मार्गांवर सुसज्ज बस सोडण्याची मागणी
बेळगाव : परिवहन मंडळाचा सुरक्षित प्रवास मानला जातो. तिकिटांचा दर माफक असल्याने नागरिक परिवहन मंडळाच्या प्रवासाला पसंती देतात. मात्र बेळगाव ते हैदराबाद दरम्यान मोडकळीस आलेली एसी बस सोडण्यात आली. लांबपल्ल्याच्या मार्गावर सुसज्ज बसेस सोडण्याऐवजी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून मोडकळीस आलेली बस सोडण्यात आली. परिवहनचा प्रवास म्हणजे अत्यंत सुरक्षित, असे मानले जात असतानाही नादुरुस्त व खराब बस सोडण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य परिवहन मंडळाचा प्रवास सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर मानला जातो. माफक दरात तिकिटे उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक परिवहन मंडळाच्या बससेवेवर अवलंबून असतात. मात्र अलीकडेच बेळगाव ते हैदराबाद या लांबपल्ल्याच्या मार्गावर मोडकळीस आलेली एसी नॉन-स्लीपर बस सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव ते हैदराबाद एसी बससाठी 1680 रुपये आकारले जातात. दर माफक असला तरी बस सुविधा पुरविताना विशेषत: लांबपल्ल्याच्या मार्गांवर सुसज्ज बस सोडण्याची आवश्यक आहे.
विशेष म्हणजे बेळगाव-हैदराबाद हा मार्ग लांबपल्ल्याचा असल्याने या मार्गावर सुस्थितीत, आरामदायी आणि सुसज्ज बसेस धावणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात मोडकळीस आलेली व अयोग्य बस पाठविल्याने परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या घटनेमुळे परिवहनच्या सेवांबाबत नागरिकांमध्ये असलेला विश्वास डळमळीत होण्याची शक्मयता आहे.
अधिकाऱ्यांना समज देणे आवश्यक
नियमित देखभाल, बसेसची तपासणी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे असताना अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना समज देणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात अशा नादुऊस्त बस मार्गावर सोडल्या जाणार नाहीत याची खात्री द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. परिवहन विभागाने त्वरित पावले उचलून प्रवाशांचा विश्वास पुन्हा संपादन करणे आवश्यक आहे.