संक्रमणकाळ : कोणाला साधक? कोणाला बाधक?
भारतीय बाजाराची दिवसेंदिवस सुरु असलेली पडझड म्हणजे बदलत असलेल्या जगाची केवळ सुरुवात आहे. आत्तापर्यंत शेअर बाजारात सगळ्यांची चांदी होत होती. सत्ताधारी देखील ‘पैसा फेको’ असे जणू म्हणत होते. वाहत्या गंगेत हात धुवून घ्या असे सांगत होते. मध्यम वर्गाला आपलेसे करावयाचे होते, त्याला आपल्याकडेच ठेवावयाचे होते. आता दिवसेंदिवस दुर्दैवाचे दशावतार सुरु झालेले आहेत. कोणाला काय होतेय याचा पत्ताच नाही. ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ असे म्हणणे भाबडेपणाचे आहे. भारतीय बाजारातील गुंतवणूकदार जणू गाडला जात आहे आणि त्याचे कोणतेच परिणाम होणार नाहीत असे मानणे कितपत शहाणपणाचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
जग झपाट्याने बदलू लागले आहे. कालपरवापर्यंत स्वत:ला जगाचा बादशाह म्हणून प्रोजेक्ट करत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध त्याच्याच अमेरिकेत लाखोंची विरोध प्रदर्शने सुरु झालेली आहेत आणि ती देखील जागो जागी. या प्रदर्शनांनी हबकलेल्या ट्रम्प यांनी 90 दिवस वाढीव व्यापार कर तहकूब केलेले असले तरी अमेरिका आणि चीनमधील त्यावरील व्यापार युद्ध कमी होण्याची सूतराम शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्याचा परिणाम भारतावर काय होणार? कितपत होणार? कोणावर होणार? हे येणारा काळ दाखवेल. ट्रम्प साहेबांच्या तिरकस तऱ्हेवाईकपणाच्या तडाख्यातून भारत सुटणार नाही, सुटू शकणार नाही हे मात्र दिसत आहे. भारतावर चीनपेक्षा कमी व्यापार कर लादल्यामुळे आपले चांगभले होईल असे भासवले जात असले तरी तसे अजिबात नाही. कुडमुड्या ज्योतिषांपासून सावध राहण्याचे हे दिवस आहेत. आधीच मर्कट तयातची मद्य प्याला असे अमेरिका करू लागलेली आहे. कोणाकोणाचे बारा वाजणार हे हळूहळू दिसणार आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ चा नारा दिलेले ट्रम्प चीनलाच प्रत्यक्षात मोठे करत आहेत. भारत आगीतून फुफाट्यात पडणार काय?
मात्र जागतिक राजकारणातील एक मतप्रवाह असादेखील आहे की जर दोन दादा मंडळींत भांडण सुरु असेल तर अशा वेळी इतरांनी फारसे बोलण्याचे काम नाही. ‘जर आपल्या शत्रूचा काटा परस्पर काढला जात असेल तर तेव्हा गप्प राहण्यातच शहाणपण आहे’. चीन जर अजून मोठा दादा बनला तर तो कोणालाच आवरणार नाही अशावेळी त्याचा वेळीच शक्तिपात केला पाहिजे असे अमेरिकन रणनीतीकारांना वाटत आहे.मागील आठवड्यात मोठ्या गाजावाजात संसदेत पारित झालेल्या वादग्रस्त वक्फ विधेयकावर फारसे कोणी बोलत असताना दिसत नाही. प्रत्येकाला अचानक आपल्या रोटीची/भाकरतुकड्याची चिंता सतावू लागलेली आहे. चार वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव सर्वात कमी झालेले असताना भारतात मात्र गॅस सिलिंडरचे भाव 50 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत. तेलावरील कर देखील वाढवला गेला आहे आणि गब्बर झालेल्या तेल कंपन्यांकडून सध्या तो उकळला जात आहे इतकेच. जेव्हढे मनोहर भासवले जात आहे तेव्हढे आर्थिक चित्र अजिबात मनोहर नाही याचीच ही पावती होय. अशातच हॉटमेलचे सबीर भाटिया यांनी भारताचे कान टोचले आहेत. आपल्या देशात ज्याप्रकारे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (सकल घरेलू उत्पादन) ठरवले जात आहे ती प्रणालीच चुकीची आहे. चीनसारख्या वेगाने प्रगत होत असलेल्या राष्ट्राशी आपल्याला बरोबरी करावयाची असेल तर देशाने आपल्या कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केला पाहिजे आणि सर्वाना शिक्षण आणि मूलभूत सुविधा मिळण्याची तजवीज केली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.
चीनी ड्रॅगन लेचापेचा नाही. अमेरिकेनेच त्याला जगाची फॅक्टरी बनवली असल्याने भारताच्या मानाने चीनची आर्थिक ताकद ही काही पटीने मोठी आहे. तिथे फारशा घोषणा होत नाहीत. कोणा नेत्याचे स्तुतिपूजन होत नाही. काम होते. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असे स्पष्ट धोरण असल्याने एकदा का एक निर्णय झाला की तो तडीस नेण्यास फारसा काही वेळ लागत नाही. गगनचुंबी इमारती आणि मोठे पुलदेखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काही महिन्यात पूर्ण होतात. तिथला कामाचा उरक बघितला तर आपण 19व्या शतकात आहोत का असा प्रश्न पडतो असे जाणकार मानतात. तात्पर्य काय तर येनकेन प्रकारेण अमेरिकेच्या हातावर तुरी देऊन चीन आपला दबदबा वाढवू शकतो. ट्रम्प यांचे वादळ येणार आहे हे तो अगोदरपासून जाणून असल्याने त्याने अगोदरपासून प्रतिचढाईची तयारी केली आहे. चीन-अमेरिकेच्या या साठमारीत भारताचे संकट अजून गहिरे झाले तर नवल ठरणार नाही. जाणकार मानतात की चीन अचानकपणे आपल्या चलनाचे अवमूल्यन करू शकतो आणि असे घडले तर पेच अमेरिका आणि इतर देशांपुढे उभा राहणार आहे. ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयांनी अमेरिकेत मंदी येऊ घातली आहे आणि तिचा पगडा येत्या महिन्यात वाढू शकतो. ‘पी हळद आणि हो गोरी’ असा प्रकार होत नसतो हे ट्रम्प साहेबांना जेव्हा कळेल तेव्हा उशीर झालेला असेल.
अशावेळी अशा भयानक संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारत कितपत तयार आहे हा लाखमोलाचा प्रश्न आहे. देशापुढे मोठे संकट आ वासून उभे असताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देशातील स्टार्ट अप उद्योगाला कानपिचक्या देऊन अपशकूनच केलेला आहे. कालपरवापर्यंत साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप उद्योग हा देशाचा स्वाभिमान आहे अशा प्रकारचे गौरवोदगार काढत होते. पण गोयल महाशय आता त्यांना जणू बाजारबुणग्यांची फौजच मानत आहेत. चीनच्या स्टार्टअप समुदायाने आपल्या संशोधन आणि चिकाटीपूर्ण कार्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सारख्या अतिप्रगत तंत्रज्ञानात देशाचे झेंडे लावले आहेत तर या उलट भारतीय स्टार्टअपने काय कमावले आहे? असा सवाल विचारून त्यांनी संकटाला तोंड देण्याबाबत सरकारची अस्वस्थताच दाखवलेली आहे. कालपरवापर्यंत जगातील सर्वात वेगवान असा गाजावाजा केली जात असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेचा एकंदर हाल आज चांगला नाही. जगाला उद्याची चिंता भेडसावू लागलेली आहे.
भारतीय व्यवस्था भ्रष्टाचाराने कशी बरबटलेली आहे असे वळणा/आडवळणाने स्टार्टअप मंडळी सांगू लागलेली आहेत. ‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’ ची चिरफाड सुरु झालेली आहे. मदमस्त अधिकारीवर्ग कोणाचेच ऐकत नाहीत आणि वाणिज्य मंत्री मात्र आम्हाला उपदेशाचे डोस पाजत आहेत. ‘अहो दाजीबा, हे वागणे बरे नव्हे’. असेच काहीसे सुचवले जात आहे. सिंगापूरसारख्या अतीछोट्या पण अतिप्रगत देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधून येणाऱ्या वादळाची कल्पना दिली. ‘आपला देश हा व्यापारावर मोठा झाला आहे पण आता व्यापाराचे जागतिक बाजारातील नियमच तोडले जात असताना येनकेन प्रकारेण प्रत्येक देश आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणार आहे. येणारा काळ संकटाचा आहे’ असे सांगत त्यांनी देशाला सावध केले आहे. याबाबत मोदींची ‘मन की बात’ देशाला कधी कळणार? अशी कोपरखळी विरोधक मारत आहेत.
वाढीव व्यापार कर ज्यांच्यावर लावले आहेत अशी बरीच राष्ट्रे आमच्याकडे वाटाघाटी करण्यासाठी गयावया करत आहेत असे सांगत ट्रम्प यांनी आगीत तेल ओतले आहे. हे देश कोणकोणते आहेत त्यांची नावे जरा सांगा अशी खट्याळ मागणी होणारच. देश अशा संक्रमणकाळातून जात असताना विरोधक देखील विचारमंथनाला लागलेले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे अधिवेशन नुकतेच पार पडले आणि त्यानंतर काँग्रेसचे अधिवेशनदेखील. काँग्रेसला सूर सापडला आहे काय हे पुढील वर्षभरात दिसून येईल. गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात भरपूर चिंतन झालेले असताना भाजपनेदेखील आपल्या साऱ्या मुख्यमंत्र्यांची तसेच प्रदेश अध्यक्षांची बैठक बोलावलेली आहे. येणारा काळ आव्हानात्मक आहे. तो कोणाला साधक आणि कोणाला बाधक ठरणार हे लवकरच दिसणार आहे.
सुनील गाताडे