तृतीयपंथी शिवानीला मिळणार ‘दीक्षांत’मध्ये सन्मानाची पदवी
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
तृतीयपंथीयांची नेहमी समाजाकडून अवहेलना केली जाते. मात्र, या सर्व समस्यांना तोंड देत, अथक प्रयत्न करून शिवानी गजबरने शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. यानंतर वनस्पती शास्त्रामध्ये बी.एस्सी. पदवीही मिळवली. यंदाच्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तिचा सन्मान केला जाणार आहे. शिवानीने पदवीधर होत समाजाकडून अवहेलना करणाऱ्यांना चपराक दिलीच आहे. त्यासोबत इतर तृतीयपंथीयांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
एखादी जिद्द बाळगली की ती पूर्ण करण्याची शक्ती आपोआपच निर्माण होते. शाळेत असताना मुलांकडून चेष्टा-मस्करी केली जायची. मुलेच काय मुलीही जवळ करत नसायच्या. अपमानास्पद वातावरणात जिद्दीने समाजाचा त्रास सहन करत तिने शिक्षणाकडे कल वाढवला. ती सहा महिन्यांची असताना आईचे निधन झाले. कसेतरी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला घर सोडावे लागले. पण शिक्षणासाठी तिची धडपड सुरूच होती. त्यातच कोल्हापूरातील एका वकिलांनी बालकल्याण सकुल येथे तिच्या शिक्षण व राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर 2010 मध्ये तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीला 65 टक्के गुण मिळवून पास झाल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला.
शिवानीला कॉलेजमध्ये मुले चिडवायची, चेष्टा-मस्करी करायची. त्यामुळे एक वर्ष शिक्षण बंद केले. त्यानंतर गुरूंनी अकरावी, बारावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खराडे कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. 2013 मध्ये 51 टक्के गुण मिळवून ती बारावी उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा करून एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी केली. तिथेही काही जणांनी तिला त्रास दिल्याने तिला नोकरी सोडावी लागली.
- समाजकार्यात पुढाकार
शिवानीने 2019 ला बेंगलोर गाठले. तिथे एका कंपनीत तृतीयपंथीयांसाठी देण्यात येणारे ट्रेनिंग घेऊन ती कोल्हापुरात दाखल झाली. त्यानंतर कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले होते. अशा स्थितीत तिने लोकांची सेवा सुरू केली. यामध्ये कोरोना रूग्णांना सीपीआरमध्ये मदत, औषधोपचारासाठी मदत सुरू केली. समाजकार्य करायचे तर शिक्षणाची जोड हवी, हे ओळखून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचा निश्चय घेतला.
- अखेर पदवी मिळवलीच, आता एल.एल.बी. करणार
शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून गतवर्षी वनस्पतीशास्त्रात बी.एस्सी. पदवीही प्राप्त केली. काही कारणाने तिला अद्यापही प्रमाणपत्र मिळालेले नाही. यंदा पदवीदान समारंभात सन्मानाने तिला पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कठीण प्रसंगांना तोंड देत तिने अखेर पदवी मिळवलीच. आता अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागात एम.एस्सी द्वितीय वर्षात ती शिकत आहे. पुढे एल.एल.बी. करण्याचा मानस असल्याने तिने सांगितले.
- कुलगुरूंचे सहकार्य
शिवाजी विद्यापीठात प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. मात्र, कुलगुरूंनी तिला मोलाचे सहकार्य केले. शिक्षणाची धडपड पाहून न्यू कॉलेजच्या प्राध्यापकांनी तिची कुलगुरूंसमवेत भेट घालून दिली व तिला प्रवेश मिळाला.
- स्वतंत्र आरक्षणाची गरज
शिक्षण घेताना फार अडचणी येतात. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य होत नाही. बऱ्याचदा विविध दाखले मिळवणे अवघड असते. सामान्यांना सहज दाखल मिळवता येतो. मात्र, तृतीयपंथीयांना अडचणींचा सामना करावा लागातो. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. स्वतंत्र आरक्षणासह मानसन्मान वाढावा, यासाठी ‘तृतीयपंथीय सन्मान’ सारख्या योजना अंमलात आणणे आवश्यक आहे.
-शिवानी गजबर