वनखात्याच्या कार्यालयाचा कायापालट
आवाराच्या सौंदर्यात भर, विविध विकासकामांना गती
प्रतिनिधी/ बेळगाव
वन क्षेत्राचे संवर्धन करणाऱ्या वनखात्याच्या कार्यालयाचा कायापालट झाला आहे. इमारतीबरोबर आवारातील झाडे हटवून सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वनखात्याच्या कार्यालयाच्या सौंदर्यातही भर पडू लागली आहे. विविध शोभिवंत झाडे लावण्याबरोबरच पार्किंगसाठीही सुसज्ज जागा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे वनखात्याचे कार्यालय आकर्षक दिसू लागले आहे.
लाखो रुपयांच्या निधीतून कार्यालय परिसरातील विकासकामांना गती देण्यात आली आहे. आवारात गटारी, पेव्हर्स, उद्यान, विविध शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर एसीएफ कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वनक्षेत्र आणि वन्यप्राण्यांचे महत्त्व पटावे यासाठी विविध छायाचित्रेही रेखाटण्यात आली आहेत. लहान बगीचाही उपलब्ध करण्यात आला आहे.
कार्यालयाच्या आवारात असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या परिसरातही सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरवर्षी 11 सप्टेंबर हा राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वन हुतात्मा स्मारकाजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी विविध फुलांची आणि शोभिवंत झाडे लावून सौंदर्यात भर घालण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध जंगली वनौषधी आणि फळाफुलांच्या रोपांची लागवड झाली आहे.
दहा लाखांचा निधी खर्ची
नागराज बाळेहोसूर (एसीएफ)
वनखात्याच्या आवारात असलेली धोकादायक निलगिरीची झाडे हटविण्यात आली आहेत. शिवाय सर्व परिसराचे सपाटीकरण करून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. काँक्रिटचा रस्ताही करण्यात आला आहे. यासाठी दहा लाखांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे.