परिश्रमातून श्रीकृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिराचा कायापालट
कोल्हापूर / संग्राम काटकर :
हे आहे हुतात्मा पार्क गार्डनमधील हिरवाईने वेढलेले द्वारकाधीश श्री गोपाल कृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिर. पौराणिक मंदिर म्हणून त्याची ओळख. या मंदिराला दीड वर्षापूर्वी लागलेली गळती दिसली. ऑईल पेंट रंगाने मंदिराचे मूळ अस्तित्व हरवल्याचे दिसले. हे पाहून जय शिवराय मित्र मंडळ व गार्डनप्रेमी ग्रुपने मंदिराचा कायापालट करण्याचे ठरवले. कृतीशील होऊन मंदिराची गळती काढली. मंदिरावरील ऑईल पेंट रंगही काढून त्याचे मुळस्वऊप उजेडात आणले.
हुतात्मा पार्कातीलच काढून ठेवलेले लोखंडी रेलिंग मंदिराच्याभोवतीने उभा केला. या रेलिंगमुळे मंदिराला वेगळा लूक आला आहे. लोकही मंदिर पाहण्यासाठी हुतात्मा पार्कात येऊ लागले आहे. गेल्या सहा महिन्यातील हा मोठा बदल आहे. हुतात्मा पार्कातील द्वारकाधीश श्री गोपाल कृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिराचा भाविक वर्ग तसा कमीच आहे. त्यामुळे काही वर्षांपासून दुरवस्थेतच उभे असलेल्या या मंदिराकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. परंतू या मंदिराची महती खूप मोठी आहे. त्याचा करवीर महात्म्यात उल्लेख आहे. असे हे दुर्लक्षित मंदिर जाणकारांच्या परीश्रमातून झालेल्या सुशोभीकरणाने खुलून गेले आहे.
नव्या वर्षाच्या सुऊवातीला म्हणजे जानेवारी (2025) महिन्यात मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जय शिवराय मित्र मंडळ, गार्डनप्रेमी ग्रुपचे पांडुरंग पाटील, नंदकिशोर देशपांडे, संदीप देसाई, रवींद्र सुतार, निलेश देसाई, जगन्नाथ महाळंग, नंदकुमार नलवडे, मनोज शिंदे, श्रीकांत दळवी, सुरेश गायकवाड, अलका जाधव व सीमा खराडे हे सर्व जाणकार एकवटले. त्यांना अनेक दुरवस्था दिसल्या. सर्वांनी एकदिलाने मंदिर दुरवस्थामुक्त करतानाच त्याचे सुशोभीकरण करण्याचेही पक्के केले. त्यासाठी हुतात्मा पार्क गार्डनमध्ये मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकला येणाऱ्याबरोबरच शिवाजी उद्यमनगरातील जनमाणसांना पैसे, वस्तू स्वरूपात दान करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी पैसे, फरशी, सळई, सिमेंट, शेडसाठी लागणारे साहित्य व इलेक्ट्रिक साहित्य जय शिवराय मित्र मंडळाकडे दान केले. मिळालेल्या साहित्यामधून फेब्रुवारीत मंदिर सुशोभिकरण कामाला सुरुवात केली. मंदिराची गळती थांबवली, शिखर व त्याच्या भोवतालचा स्लॅब वॉटरप्रूफिंग केला. मंदिराच्या आतील व बाहेरील दगडी भितींचा दिलेला ऑईल पेंटचा रंग काढला.
लिंगेश्वर महादेव मूळ स्वरूपात दिसेल, अशाप्रकारे त्याच्या भोवतीने फरशी बसवली. मंदिराच्या मोठ्या दिवळीतील फरशी आणि सिमेंट काढले तेव्हा मात्र अर्धस्वऊपात बुजलेली श्रीकृष्णाची दगडी मूर्ती पूर्ण स्वऊपात दिसून आली. पुढील टप्प्यात लिंगेश्वर महादेवाची पिंड व श्रीकृष्णाच्या मूर्तीची केलेल्या पाहणीत काहीशी झिज झाल्याचे दिसून आले. त्यावर एक उपाय म्हणून पिंड व मूर्तीला वज्रलेप केला. मूर्तीकार नारायण माजगावकर यांनी हे वज्रलेपाचे काम केले आहे. वज्रलेपानंतर श्रीकृष्णाची मूर्ती मंदिराच्या दिवळीमध्ये पुन्हा विराजमान केली. मंदिराच्या चौकटीत गणपतीच्या मूर्तीला वज्रलेप केला. हुतात्मा पार्काच्या दर्शनीला 1972 साली महापालिकेने आकर्षक लोखंडी रेलिंग लावले होते. ते सहा महिन्यापूर्वी काढले होते. ते मंदिराच्या भोवतीने उभा केले. त्याची दुरुस्ती करून रंगकामही केले. याने मंदिराला कमालीची शोभा आली.
- उज्जैनहून मागवलेले लिंग
येथे शेजारी संगमेश्वर महादेवाचे शिवलिंग होते. त्याचीही झिज झाली होती. हे शिवलिंग धार्मिक विधीने पूर्वी ज्या जागी होते, त्याच जागी जमिनीखाली विराजमान केले. नंतर मूळ रुपातील दुसरी नवी पिंड बनवली. या पिंडीवर उज्जैनहून मागवलेले लिंग बसवले. यावर आकर्षक मंडप उभा केला. येत्या 14 व 15 ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा व श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या सोहळ्याला भाविकांनी यावे, असे आवाहन पांडुरंग पाटील यांनी सांगितले.
- द्वारकाधीश श्रीकृष्ण लिंगेश्वर मंदिराची महती अशी
भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले. त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले. इथे आल्यानंतर जयंती आणि गोमती नदींचा संगम असलेल्या म्हणजे हुतात्मा पार्कच्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले. इथे जणू प्रती द्वारकानगरी तयार झाली. या द्वारकेला पाहून, या द्वारकाधीशाला आणि करवीरातील सर्व शिवलिंगाच्या दर्शनाचे पुण्य देणारे लिंगेश्वर महादेव यांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले. अशा ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुखाने पंचगंगा महात्म्य सांगितले. याशिवाय सर्व पापांच्या परिहारासाठी शक्ती चतुष्क म्हणजे एकवीरा, पद्मावती, प्रत्यंगिरा आणि अनुगामिनी अशा चार देवतांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. या जगत् व्यापक श्रीकृष्णाचे करवीरकाशी अर्थात कोल्हापूरी देखील अनोखे नाते आहे.