वेलिंगकर यांना तडीपार करा
काणकोणातील ख्रिस्तीधर्मियांची मागणी, पोलीस स्थानकावर मोर्चा
काणकोण : हिंदू महासभा आघाडीचे गोवा राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची जी मागणी केली आहे त्याने तमाम ख्रिस्तीधर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याच्या निषेधार्थ काणकोणच्या र्स्तीबांधवांनी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला आणि वेलिंगकर यांना अटक करण्याबरोबर त्यांना तडीपार करण्याची मागणी केली. यासंबंधीचे लेखी निवेदन काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिश रा. देसाई यांना माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, फा. सिडनी, नेविल ग्रासियस व इतरांनी सादर केले. काणकोण तालुक्यातील खोल, आगोंद, चावडी, भाटपाल, गालजीबाग, चिपळे, लोलये, पोळे भागांतून 800 पेक्षा अधिक ख्रिस्ती महिला-पुरुष तसेच युवक-युवती या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मागणी मान्य झाली नाही, तर रास्ता रोको करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
‘गोंयच्या सायबा’ची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली असून ख्रिस्तीबांधवांप्रमाणेच अन्य धर्मीय देखील तेवढ्याच श्रद्धेने त्यांच्या अवशेषांचे दर्शन घेतात. काणकोण तालुक्यात ख्रिस्तीबांधव आणि हिंदूबांधव आजवर गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत. मात्र असे प्रकार धार्मिक कलह निर्माण करणारे असूनगोव्यातील भाजप सरकार अशा असहिष्णू प्रकारांना चालना देत आहे, असा स्पष्ट आरोप यावेळी बोलताना इजिदोर फर्नांडिस, लोलयेचे फा. सिडनी, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, काँग्रेसचे जनार्दन भंडारी, नगरसेवक शुभम कोमरपंत, गास्पर कुतिन्हो आणि इतरांनी केला. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे धार्मिक कलह निर्माण करणाऱ्या शक्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चात काणकोण महिला काँग्रेसच्या उर्सिला डिकॉस्ता, सांतान द कॉस्ता, श्रीस्थळचे माजी सरपंच रामू नाईक, नेविल ग्रासियस, रॅमी बोर्जिस, आबेल बोर्जिस, काँग्रेस गट समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरीक्षक देसाई यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक या ठिकाणी तैनात केली होती. मात्र ख्रिस्तीबांधवांनी शांततापूर्ण रितीने हा मोर्चा काढून त्याचा समारोप केला.