पलूसचे गावतळे नगरपरिषदेकडे हस्तांतरित करा
पलूस :
पलूस येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक गाव तळ्याचा विकास करण्यासाठी नगरपरिषद हद्दीमधील (गट नं ४६१/१, गट नं ४६१/२ वसिस नं १५४४) गाव तळ्याची जागा पलूस नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश येसुगडे यांनी सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, पलूस नगरपरिषदेची स्थापना १६ मार्च २०१६ रोजी झाली असून शहराची सध्याची लोकसंख्या ही सुमारे ४५००० च्या आसपास आहे. पलूस शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख निर्माण होत असून पलूस बाजारपेठ पण विस्तारित होत चालली आहे. शहरालगतच्या किर्लोस्करवाडी व सांडगेवाडी औद्योगिक वसाहतींमुळे शहरात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या विचारात घेण्यासारखी आहे. पलूस नगरपरिषद हद्दीतील गट नं ४६१/२ मध्ये एक ब्रिटिशकालीन गावतळ असून सदरचे गाव तळ्याची जागा सध्या महाराष्ट्र शासन गायरानच्या नावे असलेने सदरचे गावतळे हे सुस्थितीत राहण्यासाठी तसेच विकास होण्यासाठी सदरची जागा नगरपरिषदेच्या ताब्यात असणे गरजेचे आहे.
गावकामगार तलाठी पलूस यांच्याकडील जा. क्र.०७/२०२४ दि. ९ मे२०२४ रोजीच्या पत्रानुसार सदरचे क्षेत्र नगर भूमापन झालेले आहे, असे कळविण्यात आलेले आहे. तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पलूस यांच्याकडील जा. क्र. १००२/२०२४ दि ११ सप्टेंबर २०२४ अन्वये सि स नं १५४४ चि मिळकत पत्रिका शेतीकडे व सत्ता प्रकार शेती, असे नमूद असलेने सदरची जागा नगरपरिषदेच्या नावे झाल्यानंतर त्याठिकाणी बोटिंगची व्यवस्था होवू शकते. तसेच नगरपरिषदेचे उत्पन्न देखील वाढू शकते. तसेच नगरपरिषद पलूस नगरपरिषद प्रशासकीय बैठक ठराव १५२ दि २५ मे २०२३ अन्वये सदरचे गावतळे सुशोभीकरण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच गट नं ४६१/१ मध्ये प्रारुप विकास आराखड्यामध्ये गार्डन असे आरक्षण आहे. तरी सदरची जागा नगरपरिषद, पलूस यांना हस्तांतरित होऊन मिळावी. तसेच वरील सर्व बाबी विचारात घेऊन सदरचे गावतळे व हुतात्मा स्मारक जागा (गट नं ४६१/१ गट नं ४६१/२ व सि स नं १५४४) पलूस नगरपरिषदेच्या ताब्यात मिळावा, असे निवेदनात म्हटले आहे.