Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापालिकेत बदल्यांचा हंगाम; 'सोयीच्या' जागी बदलीसाठी राजकीय दबाव आणला तर खैर नाही ; महापालिकेचा इशारा
‘सोयीच्या’ जागांसाठी कर्मचाऱ्यांची धडपड; महापालिका प्रशासन सख्त
कोल्हापूर: महापालिकेतील अधिकारीव कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून 'सोयीच्या' जागांसाठी कर्मचारी राजकीय दबावतंत्र वापरू लागले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. बदलीसाठी राजकीय दबाव आणणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
शासन निर्णयांच्या अनुषंगाने महापालिकेचे स्वतंत्र बदली धोरण तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचवेळी अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या पसंतीच्या विभागात किंवा सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठीप्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा प्रशासनाला अनुभव येऊ लागला.
त्यामुळे महापालिकेने अशा कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने यासंदर्भात दिलेल्या पत्रकात, बदली ही पूर्णपणे प्रशासकीय असून कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने विशिष्ट ठिकाणी बदली मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप किंवा दबावतंत्राचा वापर केल्यास तो सेवा नियमांचा भंग मानला जाईल, असे म्हंटले आहे.