व्यवस्थितपणे होणार सत्तापरिवर्तन : रझा पहलवी
हल्ल्यांमुळे इराणचे मोडले कंबरडे : ट्रम्प यांचे मानले आभार
इराणचे निर्वासित राजपुत्र रझा पहलवी यांनी इराणच्या वर्तमान शासनाला पूर्णपणे संपवावे लागणार असल्याचे वक्तव्य केले आहे. सत्तेतील हा बदल अत्यंत व्यवस्थितपणे होणार असल्याचा दावा रझा पहलवी यांनी अमेरिकेच्या टेक्सास येथे आयोजित ‘कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स’दरम्यान केला आहे. इराणच्या शासनाला कमकुवत करणाऱ्या अमेरिकेच्या सैन्य अभियानांचे त्यांनी जोरदार कौतुक केले. तसेच त्यांनी ‘मिडनाइट हॅमर’ आणि ‘एपिक फ्यूरी’ यासारख्या अभियानांचा उल्लेख केला. या हल्ल्यांमुळे इराणच्या सत्तेवर असलेले लोक अत्यंत कमकुवत झाले आहेत. या सैन्य कारवायांमध्ये सर्वोच्चे नेते अली खामेनेई आणि त्यांचे निकटवर्तीय मारले गेले आहेत. याचबरोबर इराणच्या 80 टक्क्यांहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा भांडार आणि आण्विक केंद्रे नष्ट झाली असल्याचे पहलवी यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा मजबूत निर्धार आणि अमेरिकेच्या सैनिकांच्या साहसाने लाखो इराणींना एक संधी दिली आहे. इराणचे लोक आता दशकांपासून सुरू असलेली दडपशाही आणि अस्थिरतेला संपविण्यासाठी लढू शकतात असा दावा पहलवी यांनी केला.
पहलवी यांचा इशारा
वर्तमान शासनाचा किंचित हिस्साही शिल्लक राहिला तर धोका कधीच संपणार नसल्याचा इशारा पहलवी यांनी दिला. जे लोक 47 वर्षांपासून अराजकता फैलावत आहेत, त्यांच्यावर शांतता किंवा सुधारासाठी भरवसा ठेवला जाऊ शकत नाही. दहशतवादी कधीच शांतता आणू शकत नाहीत. जर त्यांना सत्तेवर राहू दिले गेले तर ते केवळ अधिक नुकसान अन् अस्थिरताच आणतील असा दावा पहलवी यांनी केला आहे.
इराण प्रॉस्पेरिटी प्रोजेक्ट
देशाच्या आत अन् बाहेर राहणाऱ्या इराणींच्या मागणीवर लोकशाहीवादी बदलाचे नेतृत्व करण्यास मी तयार आहे. माझ्या टीमने ’इराण प्रॉस्पेरिटी प्रोजेक्ट’ (आयपीपी) नावाने एक विस्तृत योजना तयार केली आहे. ही योजना शासन कोसळल्यानंतर पहिले 100 दिवस आणि देशाच्या दीर्घकाळापर्यंत पुनउ&भारणीसाठी एका रोडमॅपप्रमाणे काम करणार असल्याचे उद्गार पहलवी यांनी काढले आहेत.
अमेरिकेला आवाहन
अमेरिकेने स्वत:चे समर्थन जारी ठेवावे. अमेरिकेने इराणच्या कोसळणाऱ्या शासनाला कुठलेच जीवदान देऊ नये. इराणच्या लोकांसाठी अमेरिकेने मार्ग मोकळा करावा असे वक्तव्य त्यांनी केले आहे.