मनपाच्या प्रशासकीय कारभारात सुधारणेसाठी कर्मचाऱ्यांची बदली
महापालिका आयुक्त शुभा बी. यांची माहिती : 46 नव्हे तर 20 कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली
बेळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा व्हावी, या उद्देशाने कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. 46 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात आपण केवळ 20 कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी अंतर्गत बदलीचा आदेश जारी केला आहे. एकाच विभागात अनेक वर्षे सेवा बजाविलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागातील माहिती मिळावी, त्यामध्ये देखील ते तज्ञ व्हावेत, या एकच उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याची माहिती मनपा आयुक्त शुभा बी. यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शुक्रवार दि. 7 रोजी मनपा आयुक्त शुभा बी. बेंगळूरहून बेळगावला परतल्यानंतर त्यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून एकच विभागात सेवा बजावणाऱ्या, तसेच विनाकारण जास्त संख्येने काम करणाऱ्या वेगवेगळ्या विभागातील 46 जणांची यादी आपल्याकडे आली होती. मात्र त्यापैकी केवळ 20 जणांची आपण चार दिवसांत नव्हे तर 15 नोव्हेंबर 2024 रोजी अंतर्गत बदली केली आहे. बेळगाव शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. मात्र आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. केवळ 16 आरोग्य निरीक्षक सध्या कार्यरत असून त्यांच्यावर प्रत्येकी दोन प्रभागांची जबाबदारी आहे. शहर स्वच्छता त्याचबरोबर व्यापार परवान्यांचे कामदेखील आरोग्य निरीक्षकांनाच पहावे लागते.
त्यामुळे आरोग्य विभागात काहींच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. 46 जणांची बदली केली असल्याची चर्चा आहे. पण प्रत्यक्ष 20 जणांचीच अंतर्गत बदली करण्यात आली आहे, असे आयुक्त म्हणाल्या. एखाद्या विभागात अनेक वर्षांपासून सेवा बजावलेला कर्मचारी त्या विभागात तज्ञ होतो. महापालिकेत अनेक विभाग असून सर्व विभागांची कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी. त्या विभागातही ते तज्ञ व्हावेत, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. पण याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. बदलीबाबत आपल्याकडे कोणाची तक्रार आली नसून केवळ एक महिला आरोग्य निरीक्षक आपल्या बाळाची समस्या असल्याचे सांगत माझ्याकडे आली होती. त्यामुळे त्या आरोग्य निरीक्षकेची मी जन्म आणि मृत्यू दाखले विभागात बदली केली आहे, असेही आयुक्त शुभा बी. यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच याबाबत पालकमंत्र्यांकडे काहींनी तक्रार केली असून पालकमंत्र्यांशी आपण चर्चा करून याबाबत योग्य सविस्तर माहिती देऊ, असे आयुक्त म्हणाल्या.