For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कपिलतीर्थ तलावाचे मनपाकडे हस्तांतर करा

12:54 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
कपिलतीर्थ तलावाचे मनपाकडे हस्तांतर करा
Advertisement

गोडसे परिवार-स्थानिक नागरिकांची प्रादेश आयुक्तांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : कपिलतीर्थ तलावाची संरक्षक भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तातडीने सदर तलाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा. भविष्यात आशाप्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी तलावाचा विकास करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली तलावाच्या जमिनीचे मालक गोडसे परिवार व स्थानिक रहिवाशांनी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांना मंगळवारी दिले.

गोडसे परिवार आणि महानगरपालिका यांच्यातील तलाव हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली. प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी बोलताना शुभम शेळके म्हणाले, कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कपिलतीर्थ तलावाच्या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळल्याने दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेस प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

तलावाची जागा ही गोडसे परिवाराच्या मालकीची आहे, असे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक नागरिक व गोडसे परिवाराच्या सदस्यांनी आज प्रादेशिक आयुक्तांची भेट घेतली आहे. यापूर्वी गोडसे परिवार व महापालिका यांच्यातील तलावाच्या जागेची हस्तांतरण प्रक्रिया रखडल्यामुळे तलावाचा विकास होऊ शकला नाही. तलावाचा विकास न झाल्याने दोन दिवसापूर्वी दुर्घटना घडली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाला गोडसे परिवारासह स्थानिक नागरिकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यामुळे रखडलेली तलावाची हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वीही तलावात वेगवेगळ्या प्रकारचे आपघात घडण्यासह आत्महत्यादेखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी इंद्रजित धामणेकर, सुरज जाधव, कपिल भोसले, धनंजय पाटील, राजू पाटील, संजय पाटील, मोतेश बार्देसकर, प्रकाश हेब्बाजी, श्रीकांत नांदुरकर, श्रीकांत गोडसे, व्यंकटेश गोडसे, महेश गोडसे, विजय गोडसे, सूर्यकांत गोडसे, ए. बी. गोडसे, जोतिबा गोडसे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.