Tramboli Yatra Kolhapur 2025: टेंबलाबाईची जत्रा डोलू लागली, काय आहेत यात्रेची खास वैशिष्ट्ये?
यात्रेतील मिरवणूक या हलगी घुमक्याच्या ठेक्यावरच बेधुंद होऊन डोलत असते
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर :
या जुलै महिन्यात मंगळवार व शुक्रवार या दिवशी बहुतेक कोल्हापूरकर आपल्या कामाच्या ठिकाणी रजा टाकतात. रजेचे कारण टेंबलाबाईची जत्रा असे उघडपणे सांगतात. आणि ही रजा नामंजूर करून चालणार नाही, असे त्यांचे वरिष्ठ आपोआपच समजून घेतात ....या महिन्यात बकरी विक्रेते तेजीत असतात.
बकरी खरेदीसाठी गिऱ्हाईक चांगले येणार याची त्यांना खात्री असते. आणि होते ही तसेच. चांगली मांद्याची बकरी खरेदी करायला पेठेचे कार्यकर्ते पार सोलापूरपर्यंत धडक मारणार हे ठरलेलेच असते......
महिन्यात हलगी, घुमकेवाल्यांना तर चांगलाच डिमांड. खणखणीत हलगी घुमवणाऱ्यांना अॅडव्हान्स पैसे देऊन त्यांचे बुकिंग केलेले असते. कारण यात्रेतील मिरवणूक या हलगी घुमक्याच्या ठेक्यावरच बेधुंद होऊन डोलत असते. आता तर यात्रेत डॉल्बीही डोकावत आहे.
ऐन पावसातच ही जत्रा असल्याने हलगी घुमकेवाल्यांना थोड्या थोड्या अंतरावर हलगी तापवायलाच लागते. याच महिन्यात तालमीच्या, पेठेच्या, गल्लीच्या जत्रेची नोटीस, तारीख, वार, तालमीच्या वार्ताफलकावर झळकू लागलेली असते. जत्रेची वर्गणी अमुक ठिकाणी आणून द्यावी किंवा गुगल पे करावी ही सूचना गल्लीतल्या सर्वांपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. आणि जत्रेची वर्गणी प्रथेनुसार भरावीच लागते.
नाहीतर वर्गणीसाठी कुरकुर करणाऱ्याला पुढे वर्षभर तालमीच्या अध्यक्षांचे शेलक्या भाषेतील ‘प्रवचन’ ऐकावे लागते. शाकाहारी रहिवाशांनाही या यात्रेची वर्गणी द्यावी लागते आणि त्यांच्यासाठी शाकाहारी जेवणाची सोय केलेली असते. कोल्हापुरात जुलै महिना म्हणजे टेंबलाबाई जत्रेचा महिना म्हणूनच ओळखले जाते.
एक दिवसाची, दोन दिवसाची जत्रा आपल्याला माहित आहे. पण महिनाभर दर मंगळवारी, शुक्रवारी चालणारी ही कोल्हापुरातील टेंबलाबाईची जत्रा खरोखरच आगळी वेगळी आहे. तिचे प्रस्थ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ज्या दिवशी गल्लीतली, तालमीतली जत्रा त्या दिवशी पहाटे गल्लीच्या तोंडावर हलगीचा कडकडाट करून - सर्वांना उठवले जाते.
त्यानंतर घरोघरी जत्रेची धावपळ सुरू होते. पंचगंगा नदीतूनच यात्रेसाठी व धार्मिक विधीसाठी पाणी आणले जाते, पूजले जाते. दुपारी गल्लीच्या तालमीच्या चौकात हलगीचा ठेका सुरू होतो. डोक्यावर सजलेल्या घागरी घेऊन महिला येऊ लागतात. तरुणाई तर यात्रेची मिरवणूक कधी सुरू होते, याची वाटच पाहत असते.
पाच मिनिटात मिरवणूक सुरू, दहा मिनिटात मिरवणूक सुरू असे म्हणत म्हणत दोन दोन तासांनी का होईना मिरवणुकीला प्रारंभ होतो. टेंबलाबाई टेकडीकडे मिरवणूक जाऊ लागते. तेथे या महिलांनी डोक्यावरील घागरीतून आणलेले पंचगंगेचे पाणी टेंबलाबाई मंदिराच्या पायरीवर श्रद्धेने ओतले जाते. त्यानंतर जत्रा परत फिरते आणि घराघरात जत्रेचे मटण रटरटू लागते.
भाकरी चपाती, मटण, तांबडा रस्सा, खिमा, पांढरा भात किंवा पुलाव याची प्रत्येक घरात पंगत भरते. यापूर्वी महिन्यात दहा वेळा मटण खाल्ले असले तरी जत्रेतील मटणावर ताव मारायचा हे जणू ठरलेलेच असते. जणू काही हा सुद्धा एका दीर्घकालीन परंपरेचाच भाग आहे, अशी यामागे भावना दिसते.
टेंबलाबाईच्या या जत्रेला धार्मिक आणि सामाजिकही कोंदण आहे. पावसामुळे पंचगंगा नदीला नवीन पाणी आलेले असते. ते पाणी श्रद्धेने थाटामाटात नेऊन टेब्ंालाबाई देवीस अर्पण केले जाते. पाण्याबद्दल असलेली ही कृतज्ञता दरवर्षी व्यक्त केली जाते आणि या जत्रेपासून पुढे श्रावण महिन्यात मटण खाणार नाही, ही अट पाळली जाते.
याचे कारण असे की श्रावण महिन्यात मटण खाणे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असते. सगळ्यात लहानच ही अट पाळतात असे नाही. पण बहुतेकजण श्रावण महिना म्हणजे मांसाहाराला नक्की सुट्टी देतात.कोल्हापुरातील टेंबलाबाईची जत्रा सर्वमान्य अशी आहे.
या जत्रेत चरचरीत मांसाहारी जेवण असले तरी त्यात गल्लीच्या तालमीच्या एकजुटीचा एक गोडवा दडलेला आहे. आणि तो पाळला जात आहे. त्यामुळेच या यात्रेत धमाल आहे, या यात्रेत एकजूट आहे. एरव्ही ठेक्यावर नाचायला लाजणाऱ्यांनाही या यात्रेत बिनधास्त नाचण्याची मुभा आहे. आणि कोल्हापूरच्या एका जुन्या परंपरेचे ते नक्कीच जतनही आहे.