For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशद्रोही जयेशची अंधार कोठडीत रवानगी

11:01 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशद्रोही जयेशची अंधार कोठडीत रवानगी
Advertisement

इतर कैद्यांकडून हल्ल्याचा धोका :  रहात असलेल्या बराकीची झडती 

Advertisement

बेळगाव : न्यायालयाच्या आवारात देशविरोधी घोषणा देणाऱ्या जयेश ऊर्फ शाकीरला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अतिसुरक्षित अशा अंधार कोठडीत हलविण्यात आले आहे. सहकैद्यांकडून हल्ला होण्याचा धोका लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने त्याला अंधार कोठडीत हलविल्याची माहिती मिळाली आहे. जयेशविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची आदींसह शहरातील अनेक अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी कारागृहात जयेश रहात असलेल्या बराकीत तपासणी केली. राजकीय नेते व बड्या उद्योजकांना खंडणीसाठी धमकावण्यात जयेशचा हात आहे. देशातील आणखी काही बड्या उद्योजकांना धमकावण्यासाठी त्याने तयारी  केली आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या काही साथीदारांनी राजकीय नेते व उद्योजकांचे क्रमांकही मिळवले आहेत. त्यामुळेच जयेश रहात असलेल्या बराकीत झडती घेण्यात आली आहे.

मात्र, पोलीस यंत्रणेला काहीच गवसले नाही. पोलीस पोहोचण्याआधीच कारागृहातील यंत्रणा मोबाईलसह सर्व वादग्रस्त साहित्य तेथून हलवते, असा आजवरचा अनुभव आहे. जयेश व त्याच्या साथीदारांकडे कारागृहात मोबाईल असल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली आहे. मात्र, तो कोणी पोहोचविला? सध्या तो मोबाईल कोठे ठेवण्यात आला आहे? याचा उलगडा झाला नाही. कारागृहातून परदेशातही फोन कॉल गेल्याचा संशय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून जयेशने खंडणीसाठी धमकावले होते. त्यावेळीही सहजासहजी त्याच्याजवळ फोन सापडला नव्हता. महाराष्ट्रातील एटीएस, नागपूर पोलीस, बेळगाव पोलीस व कारागृहातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविल्यानंतर स्वत: जयेशनेच आपल्याजवळील मोबाईल व सीमकार्ड तपास यंत्रणेच्या हातात ठेवले होते. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी जयेश व त्याच्या काही साथीदारांच्या बराकीत तपासणी करूनही काहीच मिळाले नसले तरी त्यांनी मोबाईल बाळगल्याचा संशय मात्र दूर झाला नाही. या परिस्थितीला कारागृहातील व्यवस्थाही कारणीभूत असून काही अधिकारी कैद्यांना चिथावणी देऊन आपली कामे करून घेत आहेत. त्यामुळेच कारागृहातील परिस्थिती बिघडत चालली असून व्यवस्थितपणे तपासणी झालीच तर एक नव्हे तर अनेक मोबाईल सापडण्याची शक्यता अधिक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.