जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी पशुसखींना प्रशिक्षण
पशुसंगोपनतर्फे किटचे वाटप
बेळगाव : जिल्हा पंचायत, पशुसंगोपन खात्यामार्फत पशुपालक आणि पशुवैद्यकीय खाते यांच्यातील दुवा म्हणून नेमण्यात आलेल्या पशुसखींना शनिवारी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जनावरांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी प्रथमोपचार किटचे वाटपही करण्यात आले. यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश हेडगे, तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी पशुसखींना मार्गदर्शन केले. जनावरांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनावरांच्या उपचारासाठी मदत होऊ लागली आहे. या पशुसखींना जनावरांचे आजार आणि उपचार कसे करावेत? याबाबत माहिती देण्यात आली. लाळ्या खुरकत, लम्पी आणि इतर आजारांवर नियंत्रण आणि जनावरांची काळजी कशी घ्यावी, याबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी पशुसखी बहुसंख्येने उपस्थित होत्या.