सव्यसाची गुरुकुलमतर्फे शिवकालीन युद्धकलांचे प्रशिक्षण
शिवप्रतिष्ठान-कपिलेश्वर मंदिराचा उपक्रम : सोमवारी होणार सांगता
बेळगाव : विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्ये शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळांची ओळख व्हावी, या उद्देशाने गारगोटी येथील ‘सव्यसाची गुरुकुलम’ यांच्यावतीने बेळगावमध्ये दहा दिवसांचे मोफत प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाद्वार रोड विभाग व दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या सहकार्याने शिबिर सुरू आहे. बेळगाव शहर व परिसरातील 185 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा शिबिरामध्ये समावेश आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिला व युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे. या उद्देशातून लाठीकाठी, दांडपट्टा, भालाफेक या युद्धकलांसोबत सूर्यनमस्कार, दंड-बैठका त्याचबरोबर चिंतन शिबिर घेतले जात आहे. सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 4 ते 7 या वेळेत कपिलेश्वर विसर्जन तलावावर प्रशिक्षण दिले जात आहे. 17 मेपासून शिबिराला प्रारंभ झाला असून दि. 27 रोजी सांगता होणार आहे. शिबिरामध्ये केवळ बेळगाव शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मुलींची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. अभ्यासात एकाग्रता वाढावी यासाठी चिंतन शिबिर घेतले जात आहे. सोमवारी शिबिराची सांगता होणार असून यावेळी एकत्रितरीत्या सर्व विद्यार्थी प्रात्यक्षिके दाखविणार आहेत.
शिवरायांचे विचार बिंबविणे गरजेचे
गारगोटी तालुक्यातील वेंगरुळ येथे सव्यसाची गुरुकुलमच्या माध्यमातून आजवर 70 ते 80 हजार युवक-युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ शिकविण्यात आले आहेत. निष्ठा, समर्पण व राष्ट्रनिर्मिती यासाठी नव्या पिढीमध्ये शिवरायांचे विचार बिंबविणे गरजेचे आहे. बेळगावमध्ये भव्य प्रशिक्षण शिबिर सुरू असून यामधून अनेक विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकला शिकता येणार आहे.
-ओम पाटील,प्रशिक्षक, गारगोटी