पेठांमधील तालीम, मंडळांचा कौल ठरणार निर्णायक
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक : शिवाजी पेठ, मंगळवार पेठ ठरणार किंगमेकर : काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा बावड्याकडेही नजरा
कोल्हापूर / विनोद सावंत :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, कसबा बावडा, लाईन बाजार, कदमवाडी, जाधववाडी, शाहूपुरी असा आहे. या मतदारसंघामध्ये महापालिका क्षेत्रातील 52 प्रभाग येतात. या मतदारसंघाचे राजकारण पेठांतील तालीम संस्था, मंडळाभोवती फिरते. तालीम, संस्थांचा पाठिंब्यावरच विजयाची गणिते ठरलेली असतात.
उत्तर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर तर काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्यात सामना झाला. यामध्ये क्षीरसागर यांचा पराभव झाला तर जाधव विजयी झाले. क्षीरसागर हे शनिवार पेठेतील तर जाधव हे मंगळवार पेठेतील उमेदवार होते. चंद्रकांत जाधव फुटबॉल खेळाशी संबंधित असल्याने त्यांचे पेठातील तालीम, मंडळांशी जवळचे नाते तयार झाले होते. याचाही त्यांना फायदा झाला. क्षीरसागर यांचा आता सामना सदरबाजार-विचारेमाळ येथील राजेश लाटकर यांच्याशी आहे. लाटकर यांना नक्कीच ते राहत असलेल्या सदरबाजार-विचारेमाळ-लाईनबाजार, कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातून पाठबळ मिळणार आहे. तर क्षीरसागर यांना शनिवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठतून पाठबळ मिळणार आहे. मात्र दोघांनाही इतर मतदारसंघातील मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विशेषत: पेठांमध्ये मताधिक्यासाठी चढाओढ असणार आहे.
मंगळवार पेठ, शिवाजी पेठेला महत्त्व
मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठ या दोन पेठांवर दोन्ही उमेदवारांचा प्रचारासाठी भर असणार आहे. या दोन्ही पेठेत 12 प्रभाग येतात. या ठिकाणी सुमारे 70 हजार मतदार आहेत. या ठिकाणी तालीम, मंडळांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांचा कौल ज्याच्या बाजूने असेल त्याचे नक्कीच पारडे जड असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यामय घडामोडीमुळे मंगळवार पेठ, शिवाजी पेठेला महत्व प्राप्त झाले आहे.
बावड्याची परंपरा कायम की परिवर्तन
कसबा बावड्यामध्ये आमदार सतेज पाटील यांचा प्रभाव आहे. येथे त्यांचा आदेश प्रमाण मानला जाते. यामुळे हा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे 6 प्रभाग आहेत. राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही बावड्याची पंरपरा कायम राहणार की परिवर्तन होणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
उमेदवारीचा घोळात आठ दिवस वाया
शिवसेनेची उमेदवारी योग्य वेळेत झाली असून राजेश क्षीरसागर यांनी मतदार संघात गाठीभेटी, प्रचार फेरी सुरू केली. या उलट काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून घोळ झाला. यामध्ये आठ दिवस गेले. आता काँग्रेसने राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार केले आहे. लाटकर यांच्याकडे प्रचारासाठी केवळ 11 दिवस असून त्यांना गतीने प्रचार करावा लागणार आहे.
महिला बचत गटांनाही आले महत्व
निवडणूक म्हटली की यापूर्वी मंडळ, तालीम संस्थांमधील कार्यकर्त्यांना महत्व येत होते. आता त्यांच्यासोबत महिला बचत गटांनाही महत्व आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला एकसंघ असल्याने एकाचवेळी शेकडो महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी उमेदवारांना मिळते. याचाच फायदा घेत काही उमेदवारांनी महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भेट वस्तूंचे वाटपही सुरू केल्याची चर्चा आहे.