आचऱ्यात शेतकऱ्यांना आंबा -काजू मोहोर संवर्धनाविषयी प्रशिक्षण
शेतकऱ्यांच्या किडींविषयी शंकांचे करण्यात आले निरसन
आचरा | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घटकांतर्गत आंबा फुल कीड व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुनील आचरेकर यांच्या बागेत जाऊन प्रत्यक्षपणे आंबा पिकावरील किडींचे निरीक्षण कशा प्रकारे घ्यावे याविषयीचे मार्गदर्शन झोटे मॅडम यांनी शेतकऱ्यांना केले.
या प्रशिक्षणास मा. श्री. यू. एस. पाटील सर उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली, मा. श्री. डॉ. व्ही. के. झोटे मॅडम कीटक शास्त्रज्ञ वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, माननीय श्री जेरॉन फर्नांडिस सरपंच आचरा, मा. श्री. ई. एल. गुरव तालुका कृषी अधिकारी मालवण, मा. श्री. एच. एच. आंबर्डेकर मंडळ कृषी अधिकारी आचरा, श्री. निलेश गोसावी, श्रीम. एस एस फाळके कृषी पर्यवेक्षक आचरा, श्री. डाखोरे कृषी सेवक आचरा, श्री. विवेक रंगे कृषी सेवक हडी, श्री. अश्विन कुरकुटे कृषी सहाय्यक आडवली उपस्थित होते.सदर प्रशिक्षणामध्ये मा. झोटे मॅडम यांनी आंबा फुल कीड विषयी प्रादुर्भावाचे स्वरूप व त्याचे नियंत्रण कसे करावे तसेच आंबा पिकावरील इतर किडींविषयी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तुडतुडे व फुल कीड रोखण्यासाठी फवारणी कधी घ्यावी व आर्थिक नुकसान टाळावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, फवारणी कोणत्या वेळी करावी, कशाप्रकारे करावी याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांनी आंबा पिकावरील पडणाऱ्या किडींविषयी प्रश्न विचारून आपल्या आपल्या शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मालवण श्री. गुरव सर यांनी केले. तसेच श्रीम. फाळके मॅडम यांनी सदर कार्यक्रमाचे आभार मानले.