जिल्ह्यातील पोलिसांना ड्रोन वापराचे प्रशिक्षण
बेळगाव : जिल्ह्यातील पोलिसांना ड्रोन वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट असो किंवा गर्दीच्या वेळी पोलिसांना ड्रोनची मदत होते. ही गोष्ट लक्षात ठेवून ड्रोनच्या वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रामदुर्ग, अथणी उपविभागातील पोलिसांना पोलीस मुख्यालयात प्रात्यक्षिकांसह याचे धडे देण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या पुढाकारातून जिल्ह्यासाठी एक अत्याधुनिक ड्रोन खरेदी करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानकातील दोन पोलिसांना ड्रोनच्या वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी अनेकवेळा ड्रोनची मदत होते. सध्या जिल्हा पोलिसांकडे एक ड्रोन आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ड्रोनची संख्या वाढवण्यात येणार आहेत. प्रत्येक उपविभागाला एक याप्रमाणे ड्रोन खरेदी करण्यात येणार आहेत. पुराच्यावेळी ड्रोनचे फायदे लक्षात आले आहेत. गर्दीच्यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनमुळे मदत होते. त्यामुळे पोलीस दलात आता ड्रोनची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले.