बॅडमिंटनपटूंसाठी सराव शिबिर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुवाहाटी येथे मंगळवारपासून भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी 5 दिवसांच्या सराव शिबिराला प्रारंभ होत आहे. आगामी होणाऱ्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी हे शिबिर अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनने आयोजित केले आहे.
या सराव शिबिरामध्ये अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन व अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. 2023 साली झालेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय संघाने कास्य पदक मिळविले होते. मात्र यावेळी भारतीय बॅडमिंटन संघाला अधिक दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सरावाची आणि प्रयत्नांची गरज भासत आहे. आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धा चीनमधील क्विंगदाओ येथे 11 ते 16 फेब्रवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेकरिता भारतीय संघ 8 फेब्रुवारीला चीनकडे प्रयाण करेल, अशी माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनचे सरचिटणीस संजय मिश्रा यांनी दिली. गुवाहाटीमध्ये सुरू होणाऱ्या या सरावाच्या शिबिरात देशातील कनिष्ठ बॅडमिंटनपटूंनाही संधी मिळणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेकरिता पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांच्या नेतृत्वाखाली 14 जणांचा भारतीय बॅडमिंटन संघ निवडण्यात आला असून यामध्ये सात्विक साईराज, चिराग शेट्टी, एच. एस. प्रणॉय यांचा समावेश आहे.