आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी पुरुष कुस्तीपटूंसाठी परदेशात प्रशिक्षण शिबिर
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या बहु-क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने पदके मिळवून देणाऱ्या काही मोजक्या खेळांपैकी कुस्ती हा एक खेळ आहे.भारतीय पुरुष कुस्तीपटूंसाठी परदेशात प्रशिक्षण शिबिरे निवडलेले सहा फ्रीस्टाईल कुस्तीपटू आणि त्यांचे जोडीदार आर्मेनियामध्ये प्रशिक्षण घेतील आणि त्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रशियाला जातील. त्याच वेळी, ग्रीको-रोमन कुस्तीपटू आणि त्यांचे जोडीदार उझबेकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतील.
जपानमधील आइची-नागोया येथे 19 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया‘ने दोन्ही प्रकारांतील (फ्रीस्टाईल आणि ग्रीको-रोमन) पुरुष कुस्तीपटूंना स्वतंत्र प्रशिक्षण शिबिरांसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडलेले सहा फ्रीस्टाईल कुस्तीपटू आणि त्यांचे जोडीदार आर्मेनियामध्ये प्रशिक्षण घेतील आणि त्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रशियाला जातील. त्याचप्रमाणे, ग्रीको-रोमन कुस्तीपटू प्रशिक्षण आणि अनुभवासाठी (एक्सपोजर टूर) उझबेकिस्तानला जातील. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेले फ्रीस्टाईल कुस्तीपटू आर्मेनियामध्ये सुमारे 20 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर करतील. त्यानंतर ते रशियातील स्पर्धेत सहभागी होतील आणि मायदेशी परतण्यापूर्वी तिथे आणखी काही दिवस घालवू शकतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. ग्रीको-रोमन कुस्तीपटूंबद्दल बोलताना ते म्हणाले, त्यांचेही उझबेकिस्तानमध्ये तितक्याच कालावधीचे शिबिर असेल, परंतु ते महिन्याच्या अखेरीस मायदेशी परततील.या वर्षाच्या सुरुवातीला,कुस्ती फेडरेशने पुरुष आणि महिला कुस्तीपटूंसाठी परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती. तसेच, फेडरेशनने अमेरिकेच्या इयन बटलर यांची ‘हाय-परफॉर्मन्स डायरेक्टर‘ म्हणून नेमणूक केली. जॉर्जियाचे पुरुष फ्रीस्टाईल प्रशिक्षक एमझारिओस शाको बेन्टिनिडिस हे आर्मेनियाला जाणाऱ्या संघासोबत असतील, तर रशियाचे गोगी कोगुआश्विली हे ग्रीको-रोमन संघासोबत असतील.दरम्यान, महिला कुस्तीपटू जपानच्या कोसेई अकाइशी यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षण घेतील. महिला कुस्तीपटूंनी देशातच प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी सहा पदके जिंकली होती.