सणासुदीसाठी नैऋत्य रेल्वेकडून बेंगळूर-बेळगाव मार्गावर रेल्वे
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
सणासुदीसाठी नैऋत्य रेल्वेकडून बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर मार्गावर एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे श्रावणानिमित्त गावी येणाऱ्या नोकरदारांची सोय होणार आहे. या एक्स्प्रेससाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बुकिंगही सुरू केले आहे.
बेंगळूर-बेळगाव मार्गावर दि. 20 व 22 रोजी रेल्वे धावणार असून बेळगाव-बेंगळूर मार्गावर दि. 21 व 23 रोजी ही रेल्वे परतणार आहे. बेंगळूरच्या एसएमव्हीटी रेल्वेस्थानकातून रेल्वे सायंकाळी 7 वाजता निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.25 मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात सायंकाळी 5.30 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे.
खानापूर, लोंढा, धारवाड, हुबळी यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. या रेल्वेला एकूण 19 डबे जोडले जाणार आहेत. अधिकाधिक प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन नैऋत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.