बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी कांगांरुनी दाखवला ट्रेलर
दोन्ही सराव सामन्यात भारताचा दारुण पराभव : युवा ऑस्ट्रेलियन संघाकडून व्हाईटवॉश
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलिया अ संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत अ संघावर 6 गडी राखून विजय मिळवला. यासह यजमानांनी टीम इंडियाचा 2-0 असा व्हाईटवॉश केला. भारताला पहिल्या कसोटीत 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या कसोटीत भारत अ संघाने कांगारूंसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते, युवा ऑसी संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत हा सामना जिंकला. विशेष म्हणजे, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, मुकेश कुमारसह अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश होता, पण, या भारतीय संघातील खेळाडूंना जो अनुभव आहे, त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाच्या नवख्या मुलांनी शानदार कामगिरी करत भारताचा धुव्वा उडवला.
युवा ऑसी संघाचा विजयी धमाका
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. ध्रुव जुरेल वगळता एकही फलंदाज चालला नाही. जुरेलने 80 धावांची खेळी खेळली. यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 223 धावा केल्या व 62 धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने ध्रुव जुरेलचे अर्धशतक व तनुष कोटियानच्या शानदार खेळीच्या जोरावर 229 धावा केल्या. सलामीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर जुरेल, तनुष कोटियान, नितीश रे•ाr व प्रसिद्ध कृष्णा यांनी संघाला दोनशेपर्यंत मजल मारुन दिली. टीम इंडियाचा दुसरा डाव 229 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 168 धावांचे टार्गेट मिळाले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरुवातीला गडगडला पण नंतर सॅम कोन्स्टासच्या नाबाद 73 आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर सहा विकेट्स शिल्लक राहून लक्ष्य गाठले.
कांगारुंचा विजयाचा ट्रेलर
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला आता 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. या कसोटी मालिकेआधी भारत अ व ऑस्ट्रेलिया अ संघात दोन अनाधिकृत कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. केएल राहुल, ध्रुव जुरेल, ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईश्वरन, इशान किशन, मुकेश कुमार, नितीश कुमार रे•ाr यासह अनेक स्टार खेळाडूंचा भारतीय संघात समावेश होता. तरीही भारताचे दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर सपशेल अपयशी ठरले. याउलट ऑसी संघात 7 खेळाडू असे होते ज्यांनी कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. या दोन्ही सामन्यात युवा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी भारताला ट्रेलर दाखवला आहे.
केएल, ऋतुराज फ्लॉप, ध्रुव जुरेल मात्र चमकला
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा अनुभव घेता यावा म्हणून केएल राहुलसोबत ध्रुव जुरेललाही दुसऱ्या अनधिकृत कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले होते. जुरेलने दोन्ही डावात आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. ध्रुव वगळता जवळजवळ संपूर्ण भारत अ संघ मेलबर्नच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसला. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन, कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी देखील सपशेल लोटांगण घातल्याचे पहायला मिळाले.