‘विजय 69’चा ट्रेलर सादर
अनुपम खेर, चंकी पांडे मुख्य भूमिकेत
माणूस जेव्हा वयाची सत्तरी गाठतो, तेव्हा त्याने काय करणे अभिप्रेत असते? कुटुंबातील अन्य सदस्य आणि आजूबाजूचे लोक ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट साच्यात अडकवू पाहत असतात. अनुपम खेर यांचा नवा चित्रपट ‘विजय 69’ एका अनोख्या ज्येष्ठ नागरिकाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून याचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे.
सुमारे 2 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अनुपम खेर हे स्वत:ची स्वप्नं पूर्ण करू इच्छित असल्याचे दाखविण्यात आले आहे. यात चंकी पांडे यांनी अनुपम खेर यांच्या मित्राची भूमिका साकारली आहे. ट्रायथलॉन पूर्ण करत एक नवा विक्रम नोंदविण्याचे स्वप्न 69 वर्षीय विजय बाळगून असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
या चित्रपटाची कहाणी अक्षय रॉय यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. मनीष शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलरमध्ये विजयला एका चिडचिड करणाऱ्या वृद्धापासून एक स्पर्धक व्यक्तीत बदलताना दाखविण्यात आले आहे.
अनूपम खेर यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. विजय 69 ही दुसऱ्या संधीची कहाणी आहे. आपण काय होणार हे ठरविले असताना प्रत्यक्षात आपण काय झालो यामधील फरकाविषयी ही कहाणी मांडणार आहे. हा चित्रपट निर्धार, दृढसंकल्पाविषयी असल्याचे दिग्दर्शक अक्षय रॉयने म्हटले आहे.