‘वाइब’चा ट्रेलर प्रदर्शित
कुणाल खेमू, प्रीति झिंटा मुख्य भूमिकेत
कुणाल खेमूने स्वत:चा पुढील चित्रपट ‘वाइब’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा एक अॅक्शन कॉमेडीपट असून त्यात कुणासोबत प्रीति झिंटा आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये दोन मित्र हार्दिक (कुणाल) आणि बग्स (स्पर्श)ची कहाणी आहे. बेपर्वा जीवन जगणाऱ्या या मित्रांना देश एका मोठ्या धोक्याला सामोरा जाणार असल्याचे कळते. या धोक्याला सामोरे जाण्यासाठी दोघांनाही एका मिशनमध्ये सामील केले जाते, ज्याचा हिस्सा होण्याची दोघांचीही इच्छा नसते. चित्रपटात प्रीति ही या दोन्ही मित्रांच्या बॉसच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे अभिनेत्री वंशिका धीर, कुणालसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे.
या चित्रपटात कुणालची सासू अन् दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांची झलकही दिसून येते. ‘वाइब’च्या ट्रेलरमध्ये स्पाय वर्ल्डपासून प्रेरित कहाणीला कॉमेडीत गुंडाळून दाखविण्यात आले आहे. कुणालने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘लापता लेडीज’मध्ये गंभीर भूमिका साकारल्यावर स्पर्श पहिल्यांदा विनोदी भूमिकेत दिसून येणार आहे. प्रीति झिंटा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे. दिग्दर्शनासोबत कुणालने या चित्रपटाची कहाणी देखील लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती कुणाल खेमू, चिराग निहलानी यांनी ड्रोगो फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत केली आहे. हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.