‘प्रहार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता राजकुमार राव स्वत:चा आगामी चित्रपट ‘प्रहार’वरून सध्या चर्चेत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात राजकुमारने ख्यातनाम वकील उज्ज्वल निकम यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. निकम यांनीच 2008 च्या मुंबईवरील हल्ल्यांचा गुन्हेगार अन् दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यासाठीच्या न्यायालयीन लढ्यात योगदान दिले होते. याच कहाणीला आता मोठ्या पडद्यावर दाखविले जाणार आहे.
ट्रेलरमध्ये 26/11 चा हल्ला दाखविण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर अजमल कसाब विरोधात चाललेल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद मांडला होता. त्यांच्या या लढाईत अनेक अडचणीही दिसून येतात. ट्रेलरमध्ये वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांचीही झलक दिसून येते.
या चित्रपटात ललित प्रभाकर हा अजमल कसाबची भूमिका साकारतोय. वामिका गब्बी देखील चित्रपटात महत्त्वाच्या भुमिकेत आहे. तर जयदीप यात वकिलाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सच्या दिनेश विजान यांच्याकडून करण्यात आली आहे.
