‘डिगर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
हॉलिवूड चित्रपट ‘डिगर’चा ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. ट्रेलरमध्ये टॉम क्रूझ अत्यंत वेगळ्या शैलीत दिसून येत आहे. त्याची ही भूमिका त्याच्या उर्वरित चित्रपटांपेक्षा खूपच वेगळी असेल. डिगर हा हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ट्रेलरमध्ये टॉम क्रूजला एक तेलव्यापारी डिगर रॉकवेलच्या भूमिकेत दाखविण्यात आले आहे.
डिगर अत्यंत धनाढ्या आणि घमेंडी इसम आहे, त्याच्या कामामुळे जग धोकादायक आपत्तीच्या दिशेने जात आहे. जेव्हा डिगरला हे कळते, तेव्हा तो जगाला सर्वकाही समजाविण्याचा प्रयत्न सुरू करतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक जबरदस्त अॅक्शनदृश्यंही दाखविण्यात आली आहेत. चित्रपटात टॉम हा आर्टिफिशियल मेकअपसोबत दिसून येत आहे, तसेच त्याचे वजनही वाढलेले दाखविण्यात आले आहे. डिगर हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. टॉमसोबत या चित्रपटात रिज अहमद, जॉन गुडमॅन, सँड्रा हूलर आणि जेसी पामन्स दिसून येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन एलेजांद्रो जी. इनारितु यांनी केले आहे. तर चित्रपटाची कहाणी अलेक्झेंडर डिने लारिस ज्यूनियर आणि निकोलस गियाकोबोन यांनी लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती इनारितु, मॅरी पॅरेंट, टॉम क्रूज आणि मायकल शार्प यांनी मिळून केली आहे.