‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित
‘वेलकम टू द जंगल’मध्ये स्वत:च्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर श्रेयस तळपदे ‘द इंडिया स्टोरी’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. काही लढाई दु:खाने सुरू होतात, तर काही हिंमतीने, ही ठाम निर्धाराची कहाणी आहे अशी कॅप्शन देत श्रेयसने याचा ट्रेलर शेअर केला आहे.
चित्रपटाची कहाणी एक पिता आणि वकिलाच्या अवतीभवती घुटमळणारी असून ते अन्नात किटकनाशक मिसळण्याच्या विरोधात लढत आहेत. कहाणी दमदार असून ट्रेलरमधील अनेक दृश्यं लक्ष वेधून घेतात. अन्नातील रसायनांच्या मिश्रणामुळे कशाप्रकारे एक मंद विष काम करतेय या मुद्द्याकडे हा चित्रपट लक्ष वेधून घेतो.
हा चित्रपट मुख्यकरून कोर्ट रुम ड्रामा आहे, जेथे श्रेयस अशा पित्याची भूमिका साकारतोय, ज्याची मुलगी रसायनमिश्रित अन्नामुळे मृत्युमुखी पडलेली असते. याप्रकरणी तो पोलिसांकडे धाव घेतो, परंतु तेथे त्याला निराशा प्राप्त होते, त्यानंतर तो न्यायालयात धाव घेतो असे ट्रेलरमध्ये दिसून येते. द इंडिया स्टोरी हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.