‘राणा नायडू 2’चा ट्रेलर प्रदर्शित
राणा दग्गुबातीसोबत दिसणार अर्जुन रामपाल
राणा दग्गुबाती, वेंकटेश आणि सुरवीन चावलाची वेबसीरिज ‘राणा नायडू सीझन 2’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या नव्या सीझनमध्ये अर्जुन रामपालचीही एंट्री झाली आहे. या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात अॅक्शनदृश्यं असून नात्यांच्या विश्वासघाताची कथा दिसून येत आहे.
याच्या ट्रेलरची सुरुवात सुरवीन चावला आणि राणा दग्गुबातीच्या व्यक्तिरेखेद्वारे होते. नैना स्वत:चा पती म्हणजेच राणाला समोर बसवून त्याने सर्वकाही सोडून देण्याचे दिलेले वचन पाळले का, अशी विचारणा करते. यावर राणा सर्वकाही सोडून देईन असे सांगतो. परंतु पुढील क्षणात हा फिक्सर सर्वांची हाडं मोडताना दिसून येतो.
अर्जुन रामपालच्या व्यक्तिरेखेची ट्रेलरमध्ये एंट्री दाखविण्यात आली आहे. तर राणाच्या पित्याच्या भूमिकेत वेंकटेश आहे. ट्रेलरमध्ये अभिषेक बॅनर्जी, सुशांत सिंह, कीर्ति खरबंदा, रजत कपूर तसेच डिनो मोरियाची झलक दिसून येते. गुन्हेजगतात सक्रीय राणा परिवार स्वत:ला बदलू पाहत असते, परंतु हे सर्वकाही सोपे नसते, जुने शत्रू, नवी समीकरणं, नव्या प्रकाराची आव्हानं या सीजनमध्ये दाखविण्यात येणार आहे.
2023 मध्ये राणा नायडूचा पहिला सीझन प्रदर्शित झाल होता, तेव्हा याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. यावेळी करण अंशुमान, सुपर्णा वर्मा आणि अभय चोप्राच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या दुसऱ्या सीझनबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नेटफ्लिक्सवर हा दुसरा सीझन 13 जूनपासून पाहता येणार आहे. या सीझनची मोठी उत्सुकता दिसून येतेय.