‘मंडाला मर्डर्स’चा ट्रेलर प्रदर्शित
चरणदासपूरच्या प्राचीन यंत्राचे रहस्य उलगडणार वाणी
मंडाला मर्डर्स या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्सच्या भागीदारीत निर्मित ही सीरिज चालू महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात चरणदासपूरच्या जंगलांमधील एका प्राचीन यंत्राच्या रहस्यांविषयी सांगण्यात आले आहे. सीरिज सस्पेन्स आणि थ्रिलरने युक्त असून यात सुरवीन चावला, वाणी कपूर, श्रिया पिळगावकर हे कलाकार दिसून येणार आहेत.
मंडाला मर्डर्स ही सीरिज नेटफ्लिक्सवर 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. काही रहस्य विज्ञानापलिकडील असतात अशी कॅप्शन देत नेटफ्लिक्सने याचा ट्रेलर सादर केला आहे. ट्रेलरमध्ये एका प्राचीन यंत्राविषयी सांगण्यात आले आहे, जे चरणदासपूरच्या जंगलांमध्ये आहे. या सीरिजमध्ये तपास अधिकारी रिया थॉमसच्या भूमिकेत वाणी कपूर आहे. अभिनेता वैभव हा दिल्ली पोलीस अधिकारी विक्रम सिंह ही भूमिका साकारताना दिसून येणार आहे.
सीरिजमध्ये रघुवीर यादव देखील मुख्य भूमिकेत आहेत. मंडाला मर्डर्सद्वारे वाणी कपूर ओटीटी सीरिजच्या जगतात पदार्पण करत आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गोपी पुरथन यांनी सांभाळली आहे. याचा ट्रेलर सस्पेंसने भरलेला असल्याने सीरिजबद्दलची उत्सुकता वाढली आहे.