‘लिलो अँड स्टिच’चा ट्रेलर सादर
डिस्नेचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लिलो अँड स्टिच’ 23 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी याचा पहिला अधिकृत ट्रेलर जारी करत चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. दोन मिनिटे 24 सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात कमांडरच्या एका डायलॉगद्वारे होते, ज्यात तो स्टिचला ‘धोकादायक प्रयोग’ ठरवितो आणि यानंतर सुरु होते रोमांच अन् गोंधळाचे सत्र.
चित्रपटात माया केलोहा ही लिलोची भूमिका साकारत असून जी हवाई येथील एक मुलगी आहे. तर स्टिच नावाच्या एलियनसोबत तिची मैत्री होते. ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा, रोमांच आणि मूळ अॅनिमेटेड चित्रपटाचे जुने आकर्षण दिसून येते.
ओहानाचा अर्थ परिवार आणि परिवारात कुणीच मागे पडत नाही आणि कुणालाच विसरले जात नाही असे ट्रेलरसोबत याच्या अधिकृत पोस्टच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डीन फ्लेचर कॅम्प यांनी केले आहे. हा चित्रपट 2002 चा क्लासिक अॅनिमेटेड चित्रपट ‘लिलो अँड स्टिच’चे नहवे रुप आहे. लाइव्ह अॅक्शन चित्रपटात जॅच गॅलिफियानाकिस, बिली मॅग्नेसेन, सिडनी अनुडोंग, काइपो डुडॉइट, टिया कॅरेरे, कर्टनी बी वेन्स, एमी हिल, जेसन स्कॉट ली आणि हन्नाड वाडिंगहॅम यासारखे कलाकार दिसून येतील.