‘खाकी : द बंगाल चॅप्टर’चा ट्रेलर सादर
हत्या, गुन्हे अन् भ्रष्टाचाराची कहाणी
2022 मध्ये ‘खाकी : द बिहार चॅप्टर’द्वारे ओटीटीवर यश मिळविणारे नीरज पांडे आता याचा पुढील भाग ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’ घेऊन येत आहेत. या वेबसीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. हा ट्रेलर राज्यातील हत्या, गुन्हे, भ्रष्टाचार आणि पोलीस विभागाची स्थिती दर्शविणारा आहे. या सीरिजमध्ये जीत मदनानी, प्रोसेनजीत चटर्जी, शाश्वत चटर्जी, परमव्रत चटर्जीसोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर ऋत्विक भौमिक, आदिल जफर खान, पूजा चोप्रा, आकांक्षा सिंह, मिमोह चक्रवर्ती आणि श्रद्धा दास देखील दिसून येणार आहे. सीरिजची कहाणी 2000 च्या दशकातील कोलकात्यावर आधारित आहे. यात निरंकुश गुन्हे, व्यवस्थेला पोखरणारा भ्रष्टाचार आणि कायदा-अंमलबजावणीची एक रोमांचक कहाणी दिसून येईल. ही सीरिज राज्य आणि खासकरून कोलकात्यात शांतता आणि न्यायासाठी समर्पित एका आयपीएस अधिकाऱ्याच्या लढाईवर आधारित आहे. एक पोलीस अधिकारी सत्तेवर असलेल्या लोकांच्या विरोधात जात न्यायप्रणालीचे रक्षण कशाप्रकारे करतो हे यात दाखविण्यात आले आहे. बंगालममध्ये गँगस्टर अन् राजकीय नेत्यांची गटबाजी शिगेला पोहोचली असताना आयपीएस अर्जुन मैत्रा यांनी त्यांना आव्हान देण्याचे धाडस केल्याचे यात दाखविण्यात आले आहे. नीरज पांडेची ही सीरिज नेटफ्लिक्सवर 20 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन देवात्मा मंडल आणि तुषार कांति रे यांनी केले आहे. तर देवात्मा मंडल, सम्राट चकवर्ती यांनी मिळून याची कहाणी अन् संवादलेखन केले आहे.