‘छावा’चा ट्रेलर सादर
अभिनेता विक्की कौशलचा पहिला ड्रामा पीरियड चित्रपट ‘छावा’ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाची पोस्टर्स निर्मात्यांकडून यापूर्वीच जारी करण्यात आली होती. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यामुळे चाहत्यांची उत्सुकता दुणावली आहे. छावा चित्रपटाचा हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता वाढविणारा आहे. मॅडॉक फिल्म्सने स्वत:च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हा ट्रेलर शेअर केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विक्की कौशल असून त्याचा लुक अत्यंत प्रभावी आहे. तर महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. औरंगजेबाची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान आणि अमर कौशिक यांनी केली आहे. छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला जाईल. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित हा चित्रपट असल्याने याबाबतची उत्सुकता अधिक आहे. विक्की आणि रश्मिका यांचा यात अभिनय पाहता येणार असल्याने हा चित्रपट यशस्वी ठरणार असल्याची खात्री सर्वांना वाटत आहे.