For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीषण आगीत चार महिलांचा होरपळून मृत्यू

07:42 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
भीषण आगीत चार महिलांचा होरपळून मृत्यू
Advertisement

बेळगावातील चव्हाट गल्लीत गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री दुर्दैवी दुर्घटना : बापलेक गंभीर जखमी

Advertisement

शेडवजा घराला लागलेल्या भीषण आगीत आई, दोन मुली आणि आत्या अशा एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून मृत्यू तर बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. सोमवार दि. 14 रोजी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ढोरवाडा, चव्हाट गल्ली येथे ही घटना घडली आहे. शॉर्टसर्कीट किंवा अन्य कोणत्या तरी कारणामुळे आगीने पेट घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून घटनेची नोंद मार्केट पोलीस स्थानकात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : शारदा गजानन धमोणे (वय 48), प्रिया गजानन धमोणे (वय 27), गंगा गजानन धमोणे (वय 24), भारती राजाराम धमोणे (वय 50) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर गजानन राजाराम धमोणे (वय 58), रोशन गजानन धमोणे (वय 21) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी संजय नारायण धमोणे (वय 43) रा. घर नं. 4773, ढोरवाडा चव्हाट गल्ली यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी घटनेची नोंद करून घेत तपास चालविला आहे. फिर्यादी संजय यांचे ढोरवाडा येथे पत्र्याच्या शेडचे घर आहे. त्यामध्ये तीन विभाग आहेत. एका खोलीत फिर्यादीचे कुटुंब, आणखी एका खोलीत काका नागेश राजाराम धमोणे व त्यांचे कुटुंबीय तर तिसऱ्या खोलीत काका गजानन राजाराम धमोणे व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास असतात.

गणेश चतुर्थीनिमित्त गजानन धमोणे यांनी आपल्या पत्र्याचे शेडवजा घरामध्ये गणपती आणून प्राणप्रतिष्ठापना केली होती. हे कुटुंबीय दरवर्षी आपल्या घरात प्रसादाचे आयोजन करून शेजाऱ्यांना बोलवत असतात. त्याचप्रमाणे सोमवारी रात्री त्यांनी प्रसादाचे आयोजन केले होते. प्रसादाचे वाटप करून रात्री उशीरा कुटुंबीय झोपी गेले. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास गजानन आणि त्यांचा मुलगा रोशन यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकू आल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या शेडकडे धाव घेऊन पाहणी केली असता खोलीत आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आगीबरोबरच धुळीचे लोळही पसरत होते. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. तशा परिस्थितीत धाडस करून फिर्यादीने शेडचा दरवाजा तोडून काका गजानन व रोशन यांना बाहेर काढले. तर शारदा, प्रिया, गंगा आणि भारती यांना भीषण आग आणि धुरामुळे घरातून बाहेर काढता आले नाही. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काहींनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बराच उशीर प्रयत्न करावे लागले.

पण यामध्ये चौघांचा मृत्यू होण्यासह घरातील संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गंभीर जखमी झालेल्या बापलेकाला उपचारासाठी एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. जखमी गजानन यांची पत्नी शारदा गवंडी, मुली प्रिया आणि गंगा या दोघी

झेरॉक्स दुकानात तर त्यांची अविवाहित बहीण घरी शिलाई काम करीत होती. गजानन हे रंगारी असून मुलगा उद्यमबागला फॅक्टरीत कामाला जातो. मोलमजुरी करून संसार करणाऱ्या कुटुंबीयांवर ओढावलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नातेवाईक आणि गल्लीतील रहिवाशांनी आक्रोश केला. सदर घटनेमुळे अनेकांची मने हेलावून गेली. ऐन गणेशोत्सवातच घडलेल्या या घटनेमुळे तातडीने पोलीस आयुक्त प्रकाश निकम, आमदार आसिफ सेठ, युवा नेते अमान सेठ, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक, मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर घटनेची नोंद करून घेत पुढील तपास चालविण्यात आला आहे.

पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांची भेट

घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सरकारच्या निदर्शनास ही घटना आणून देण्यासह पोलिसांचा अहवाल आल्यानंतर सरकारतर्फे जी मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करून मयतांसह जखमींसाठी काय करता येईल का? हे पाहू. ज्यांच्याकडे जमीन आहे पण घर नाही अशा लोकांना घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. घटनास्थळी माजी आमदार अनिल बेनके, डॉ. रवी पाटील, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, किरण जाधव आदींनी भेट देऊन पाहणी करण्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

आगीत होरपळून मृत्यू झालेल्या चारही महिलांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवागृहात हलविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर मृतदेह घराकडे न आणता मंगळवारी दुपारी थेट सदाशिवनगर येथील स्मशानभूमीकडे नेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अनेकांना अश्रु अनावर झाले.

सुदैवानेच गॅस सिलिंडरचा स्फोट नाही

ज्या घराला भीषण आग लागली त्या घरात लहान-मोठे असे पाच सिलिंडरही होते. मात्र सुदैवानेच सिलिंडरांचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा शेजारील घरांनाही धोका निर्माण झाला असता. तरीदेखील सदर आगीच्या घटनेत चार महिलांना जीव गमवावा लागला तर घरचे कर्ते गजानन हे 80 टक्के तर त्यांचा मुलगा रोशन 40 टक्के भाजला आहे. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी केली जात आहे.

आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न

प्रथमदर्शी शॉर्टसर्कीट किंवा अन्य कोणत्या तरी कारणांमुळे घराला आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आग लागल्याचे कारण काय? याची शहानिशा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. जखमी रोशन याने घरात स्फोटाचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :

.